दापोलीत २४ तासांमध्ये ३०४ मिमी पाऊस; कशेडी घाटात कोसळली दरड

रत्नागिरी : जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असून, उत्तरेकडच्या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. आज (६ जुलै) सकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये दापोली तालुक्यात तब्बल ३०४ मिलिमीटर, मंडणगडमध्ये २५९ मिलिमीटर, खेडमध्ये २१३, तर चिपळूणमध्ये १७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राजापुरात ११७, लांज्यात ९३, गुहागरमध्ये ९७, संगमेश्वरात ८२, तर रत्नागिरीत ६६ मिलिमीटर पाऊस पडला.
खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीची पाणीपातळी कालच्या तुलनेत थोडी कमी झाली असली, तरी ती अद्याप धोका पातळीच्या वरूनच वाहत आहे. धोका पातळी ७ मीटर असून, आज सकाळी आठ वाजता पाणीपातळी ९.८० मीटर आहे. चिपळूणच्या वाशिष्ठी नदीची पाणीपातळी इशारा पातळीवरून खाली आली आहे. जिल्ह्यातल्या अन्य सर्व नद्यांची पाणीपातळी कालच्या तुलनेत वाढली आहे; मात्र त्यापैकी कोणत्याही नदीने इशारा पातळी ओलांडलेली नाही.

दरड कोसळल्याने कशेडी घाट वाहतुकीसाठी बंद
अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावरच्या कशेडी घाटात आज पहाटे दरड कोसळली आहे. त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. मार्ग मोकळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
रत्नागिरी रेल्वेस्थानकाच्या छताचा काही भाग कोसळला
सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या छताचा काही भाग काल (पाच जुलै) रात्री उशिरा कोसळला. काही महिन्यांपूर्वीच या स्थानकाचं सुशोभीकरण-नूतनीकरण करण्यात आलं होतं. त्यातलाच काही भाग कोसळला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


    कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
    टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

    Follow Kokan Media on Social Media
    Follow Kokan Media on Social Media

    Leave a Reply