मुंबई : मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे असलेल्या कोकणातील कातळशिल्पांचे पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचे नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आज (७ जुलै) विधानसभेत दिली. तसेच कातळशिल्पांच्या परिसराचा विकास व पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
विधानसभेत आमदार विठ्ठल लंघे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून कातळशिल्पावरील चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, विक्रांत पाचपुते, नाना पटोले यांनी भाग घेतला. या चर्चेला उत्तर देताना अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले, की कोकणातील रत्नागिरी विभागातील सुमारे ३०० किलोमीटर लांब व २५ किलोमीटर रुंद क्षेत्रामध्ये दोन हजारांपेक्षा जास्त कातळशिल्पे (जिओग्लिफ्स) व १५०पेक्षा अधिक कातळशिल्प स्थळे आढळली आहेत. या कातळशिल्पांमुळे इतिहासपूर्व समाज व संबंधित मानवी संस्कृतीच्या अमूल्य वारशाची माहिती मिळणे शक्य होणार आहे. प्रत्येक कातळशिल्पाचे वेगवेगळ्या अंतरावरील, सूक्ष्मदृष्टीने, सर्व ऋतूंमध्ये दृकश्राव्य चित्रीकरण होणे गरजेचे आहे. यानुषंगाने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या आठ एप्रिल २०२६ रोजीच्या शासननिर्णयान्वये पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट बनवण्यासाठी येणाऱ्या १४.५० कोटी रुपये इतक्या रकमेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा निधी उपलब्ध झालेला आहे.
कोकणातील कातळशिल्पे या विषयावरील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या माहितीपटाचे अंदाजपत्रक आंतरराष्ट्रीय बाजाराचे सर्वेक्षण करून तयार करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत प्रथमतः सुमारे ४५ मिनिटांचा एक उच्च दर्जाचा सिनेमॅटिक माहितीपट असून यामध्ये एआयच्या माध्यमातून तत्कालीन जीवनशैलीचे दृश्य स्वरूपात पुनर्निर्मिती करण्यात येणार आहे. यासोबतच, युनेस्कोच्या तात्पुरत्या जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट असलेल्या सर्व नऊ स्थळांवर व त्यांच्या बफर क्षेत्रातील स्थळांवर स्वतंत्र आठ मिनिटांचे लघु माहितीपट, संपूर्ण चित्रीकरण प्रक्रियेचे दस्तऐवजीकरण करणारा एक स्वतंत्र ‘बिहाइंड द सीन्स’ माहितीपट बनविण्यात येणार आहे.
सर्व स्थळांच्या संपूर्ण चित्रीकरणाचे रॉ फुटेज, ड्रोनद्वारे घेतलेले हवाई चित्रीकरण, उच्च दर्जाची छायाचित्रे (मुद्रण व संग्रहणास योग्य) यांचा विस्तृत संग्रह संचालनालयाच्या ताब्यात येणार आहे. यासह, सदर प्रकल्पातून निर्मित दृकश्राव्य सामग्रीवर आधारित समाजमाध्यमांसाठी अल्प व दीर्घ स्वरूपातील प्रचारात्मक सामग्री, इन्फोग्राफिक्स व डिजिटल प्रसारासाठी आवश्यक कंटेंट बँक विकसित करण्यात येणार आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने या परिसराचा विकास व सेवासुविधा उपलब्ध करून देण्याचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून संरक्षक भिंती आणि अन्य कामे त्यानुसार कामे ही सुरु झाली आहेत. तसेच ही कातळशिल्पे ज्या खाजगी मालकांच्या जागेत आहे त्यांना ही याचा फायदा होईल या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे, असेही शेलार यांनी सांगितले.
दरम्यान, या भागात होणाऱ्या विकास प्रकल्पांमुळे ही कातळशिल्पे धोक्यात आल्याचा जो मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना मंत्री शेलार यांनी सांगितले, की भारतीय पुरातत्त्व खाते, राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचा प्रकल्प होणार नाही. तसेच या कातळशिल्पांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

