रत्नागिरी : खेड तालुक्यातल्या दहिवलीमध्ये डोंगराचा भाग खचून दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना काल रात्री (सहा जुलै) घडली असून, प्रशासन आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी मदतकार्य करत आहे. तीनपैकी एका व्यक्तीला वाचवलं असून, दोन जण बेपत्ता असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. खेड, चिपळूणमध्ये पाहणी दौरा केल्यानंतर सामंत यांनी चिपळूणमध्ये आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कालच्या दुर्घटनेतल्या बेपत्ता व्यक्ती जिवंत सापडण्याची शक्यता कमी असल्याचं एनडीआरएफकडून सांगण्यात आल्याचं ते म्हणाले; मात्र शोधकार्य युद्धपातळीवर सुरू असून, मृत व्यक्तींच्या वारसांना शासनातर्फे तातडीने चार लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश दिल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच कशेडीतल्या भूस्खलन झालेल्या भागाची पाहणी केली असून, बाधित दोन कुटुंबांना शासनामार्फत मदत करण्यात आल्याचंही ते म्हणाले. (व्हिडिओ शेवटी दिले आहेत.)
दरडप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचं आवाहन केलं आहे; मात्र अनेकदा नागरिकांची घर सोडण्याची मानसिक तयारी नसते. परंतु सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाला सहकार्य करून तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं, असं आवाहन पालकमंत्र्यांनी केलं
चिपळूणमधली वाशिष्ठी, खेडमधली जगबुडी आणि संगमेश्वरातली शास्त्री या नद्यांमधला गाळ काढल्यामुळे यंदा मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी मुसळधार पाऊस झाल्यावर ज्या गतीने शहरात पुराचं पाणी वाढत होतं, ती पातळी आता गाळ उपशामुळे नियंत्रणात आहे, अशी माहितीही सामंत यांनी दिली. या गाळ काढण्याचा पूर नियंत्रणात प्रत्यक्ष किती फायदा झाला, याबद्दल स्थानिक नागरिकांकडूनच खरी माहिती आणि प्रतिक्रिया घेतली जाईल, असं पालकमंत्र्यांनी नमूद केलं.
कशेडी घाटातल्या कालच्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर बोलताना त्यांनी सांगितलं, की कालची दरड कशेडी घाटात कुठेही कोसळलेली नाही, तर सपाट रस्त्यापासून डाव्या बाजूला सुमारे १५० ते २०० मीटरवर असलेला डोंगर सरकून तो रस्त्यावर आला आहे. याची नेमकी कारणं शोधून त्याचा सविस्तर पाठपुरावा केला जाईल, असंही ते म्हणाले.
लोकप्रतिनिधींनी नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती वाढवावी, असं सांगतानाच नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन सामंत यांनी केलं.
महसूल राज्यमंत्री योगेश कदम, तसंच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनीही नुकतीच दहिवली इथे घटनास्थळी भेट दिली असून, प्रशासनाकडून दुर्घटनाग्रस्तांना सर्वतोपरी साह्य केलं जाईल, याबद्दल त्यांनी आश्वस्त केलं. प्रशासनाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. मृतांच्या वारसदारांना योग्य ती मदत दिली जाईल. ज्या घरांचं नुकसान झालं आहे, ती घरं पुन्हा उभी करण्यासाठी शासन १०० टक्के आर्थिक मदत करील. संपूर्ण सरकार या सर्व कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, असं कदम यांनी सांगितलं.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

