एक हजारहून अधिक जणांनी भाट्ये किनाऱ्यावर केली स्वच्छता!

रत्नागिरी : जागतिक किनारा स्वच्छता दिन आणि सेवा पर्व २०२५ या उपक्रमांतर्गत आज (२० सप्टेंबर) सकाळी रत्नागिरी तालुक्यातल्या भाट्ये समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस विभाग, नगरपरिषद, भाट्ये ग्रामपंचायत अशा सरकार संस्था, पटवर्धन हायस्कूल, रा. भा. शिर्के प्रशाला आदी शाळांचे स्काउट विद्यार्थी, तसंच फिनोलेक्स, गद्रे मरीन यांसारख्या कंपन्या यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. त्यात सुमारे एक हजाराहून अधिक जणांनी सहभाग घेतला आणि मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचं संकलन करण्यात आलं. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवून पर्यावरण संरक्षणाला हातभार लावावा, असं आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केलं.

या वेळी केंद्रीय वन आणि हवामानबदल मंत्रालयाचे अवर सचिव सत्यप्रकाश यांची विशेष उपस्थिती होती. अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, ‘एमपीसीबी’चे उपप्रादेशिक अधिकारी उत्तम माने, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, तहसीलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, मुख्याधिकारी वैभव गारवे, भाट्ये गावच्या सरपंच प्रीती भाटकर, फिनोलेक्सचे नरेश खरे असे सर्व विभागांचे अधिकारी आणि कंपन्यांचे प्रतिनिधीही यात सहभागी झाले होते.
‘प्रदूषणामुळे समुद्रतळाशी असणारे जीव वर येत आहेत. सर्व जलस्रोतांमध्ये आपण प्रदूषण करत असून, त्यांची स्वच्छता करणं, हे प्रदूषण रोखणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छता स्वत:पासून, आपल्या घरापासून सुरू करावी,’ असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. प्लास्टिक पिशव्या टाळण्याचा संदेश देणाऱ्या कापडी पिशव्यांचं वितरण या वेळी करण्यात आलं. पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी या वेळी पथनाट्य सादर करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. या वेळी सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली. नारळाचं रोप लावण्यात आलं.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply