जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कसबा हायस्कूलच्या समर्थ मेस्त्रीचा प्रथम क्रमांक

रत्नागिरी : राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत रत्नागिरी जिल्हा क्रीडा परिषद आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १९ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडल्या. या स्पर्धेत कसबा-संगमेश्वरच्या संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीतर्फे संचालित कसबा येथील न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील समर्थ नीलेश मेस्त्रीने १७ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तो अकरावीचा (विज्ञान) विद्यार्थी आहे. समर्थची विभागस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

रत्नागिरी जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनने २०२५-२६मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत समर्थ मेस्त्रीने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे त्याची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यालयाचे प्राचार्य एच. जी. शेख, पर्यवेक्षक एस. ए. पटेल यांचे प्रोत्साहन आणि विद्यालयातील क्रीडाशिक्षक आर. एच. तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत समर्थला यशप्राप्ती झाली आहे. हे उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन अकबर खलपे, उपाध्यक्ष नियाज कापडी, उपाध्यक्ष इब्राहिम काझी, सचिव सईद उपाद्ये, सहसचिव शौकतअली खलफे, खजिनदार शिकूर गैबी, सर्व सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी समर्थचे अभिनंदन केले. तसेच विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. कसबा हायस्कूलच्या खेळाडूंनी सर्वच क्रीडा प्रकारांच्या स्पर्धेत सहभागी होऊन उल्लेखनीय कामगिरी करून जिल्हा, विभाग व राज्यस्तरापर्यंत मजल मारल्याबद्दल शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply