रत्नागिरी : कोकणातील लोककलांचे पारंपरिक पद्धतीने सादरीकरण करून विनोदी ढंगाने विदारक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याने कोकणवासीयांना अंतर्मुख केले आहे. समर्थ कृपा प्रॉडक्शननिर्मित या लोकनाट्याचा ६००वा प्रयोग २३ एप्रिल २०२६ रोजी संगमेश्वरमधील गणेशआळी येथे रंगणार आहे. (संबंधित व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिले आहेत.)
कोकणची सध्याची ज्वलंत समस्या म्हणजे रिकामी होत चाललेली घरे, वस्त्या. येथील कमावते तरुण गाव सोडून मोठ्या शहरांची वाट धरताना दिसतात आणि कोकणात परप्रांतीय येऊन येथील कामे, सेवा करतात. येथील जमिनी परप्रांतीयांनी बळकावल्या आहेत. या विदारक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याने कोकणवासीयांना अंतर्मुख केले आहे. कोकणातील मोठा समुदाय मुंबईत आहे. लोककलांचे दस्तावेजीकरण करणारा चाकरमानी कोकणात येतो. येथील लोककलांचा एकेक प्रकार चित्रित करता करता संपूर्ण कोकण त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहते. लोककलांची परंपरा, भजन, जाखडी, नमन, पारावरचे नाटक यातून एक कोकणी सामाजिक वास्तव उभे राहते. विनोदी बोचऱ्या पद्धतीने भाष्य करता करता हे लोकनाट्य नेमक्या समस्येवर बोट ठेवते. आजवर मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड यासह रत्नागिरी जिल्ह्यात या लोकनाट्याचे प्रयोग झाले आहेत. लोककलांचा धांडोळा घेत त्या रंगमंचावर मांडत कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण वृत्तीही या नाटकातून मांडली जाते. खास खवचट कोकणी विनोद आणि स्वतःवर हसण्याची खास वृत्ती अशा कोकणी प्रवृत्तीचे आणि इरसाल नमुन्यांचे दर्शन यातून घडते. २३ मार्च २०२५ रोजी या नाटकाचा पाचशेवा प्रयोग अडूर येथे झाला होता.
सुनील बेंडखळे, सचिन काळे, राजेश ऊर्फ पिंट्या चव्हाण, रवींद्र गोनबरे, अंकुश तांदळे, अनिकेत गोनबरे, विश्वास सनगरे आदींच्या प्रमुख भूमिका असलेल्या या लोकनाट्याचा पारंपरिक लोकसंगीत हाही एक कणा आहे. कोकणातील विविध गीतप्रकारांचे अत्यंत सुमधुर सादरीकरण ही याची जमेची बाजू आहे. मंगेश मोरे, मंगेश चव्हाण, अभिषेक भालेकर, स्वप्नील सुर्वे, गंधार मोरे, आणि विवेक शिलकर या वादक कलाकारांच्या सादरीकरणातून कोकणातील सुमधुर लोकगीतांचा आस्वाद रसिकांना मिळतो. शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या लोकनाट्याचा गौरव अनेक संस्थांनी केला असून, अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात सिने-नाट्य कलावंतांसमोर झालेल्या सादरीकरणानंतर सर्वांनीच कौतुकाची थाप दिली आहे. संगमेश्वर-गणेशआळीत गुरुवारी (२३ एप्रिल २०२६) रात्री दहा वाजता होणाऱ्या या सहाशेव्या प्रयोगाला रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन समर्थ कृपा प्रॉडक्शनतर्फे करण्यात आले आहे.
- कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
- टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

