मालगुंड (ता. रत्नागिरी) : कोकण मराठी साहित्य परिषदेचे २०२४ – २५ या वर्षाचे वाङ्मयीन व वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राज्यस्तरीय कविता राजधानी पुरस्कार ठाण्याचे कवी प्रवीण दवणे यांना देण्यात येणार आहे.
दरवर्षी कोमसापतर्फे वाङ्मयीन व वाङ्मयेतर पुरस्कारासाठी आलेल्या प्रस्तावांची मान्यवर व जाणकार परीक्षकांकडून छाननी करून पुरस्कार जाहीर केले जातात. त्यानुसार २०२४ – २५ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
पुरस्कारांचा तपशील असा – कादंबरी विभाग – प्रथम – र. वा. दिघे स्मृती पुरस्कार विवेक गोविलकर (सिंफनी), द्वितीय – वि. वा. हडप स्मृती पुरस्कार उदय जोशी (संघर्षपर्व), कथा प्रथम – वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार स्टीफन परेरा (काळवेळ), तर द्वितीय – विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार अशोक लोटणकर (निराधार), कविता – प्रथम – आरती प्रभू स्मृती पुरस्कार डॉ. दिलीप पांढरपट्टे (उडवाच मान माझी), द्वितीय – वसंत सावंत स्मृती पुरस्कार विलास गावडे (व्यक्त होतोय मी), आत्मचरित्र – धनंजय कीर स्मृति पुरस्कार आनंद इंदिरा श्रीधर सांडू (क्षण सोनेरी – रूपेरी आणि काटेरी), चरित्र – श्रीकांत शेट्ये स्मृती पुरस्कार शामसुंदर गावकर (भरती – ओहोटी), समीक्षा – प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार डॉ. शिल्पा जोशी (मंगेश पाडगावकरांचे गीत – काव्य), नाटक – भाई भगत पुरस्कार अरुण तुकाराम मोर्ये (कृष्णा, माझं काय चुकलं?), ललित गद्य – प्रथम – अनंत काणेकर स्मृती पुरस्कार वर्षा कुवळेकर (सफर खूबसुरत है मंजिलसे), द्वितीय – सौ. लक्ष्मीबाई व माजी न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे स्मृती पुरस्कार नितीन तेंडुलकर (अधिक उंच उडता उडता), बालवाङ्मय – प्र. श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार डॉ. लक्ष्मण शिवणेकर (सशा रे सशा), संकीर्ण – प्रथम – वि. कृ. नेरूरकर स्मृती पुरस्कार डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी (कातळशिल्पांच्या पाऊलखुणा), द्वितीय – अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार रविराज गंधे (महासागर), वैचारिक – फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार रेखा कोरे (महात्मा बसवेश्वर – कृतीतून प्रगतीकडे). कोकण मराठी साहित्य परिषदेचे कादंबरी, कथासंग्रह, संकीर्ण विभागातील विशेष पुरस्कार अनुक्रमे डंकी रूटसाठी प्रकाश पाटील यांना, अॅडजस्टमेंटसाठी मेघना साने यांना, तिमिरातून तेजाकडेसाठी डॉ. जिवबा केळुसकर तर संपादन विभागाचे विशेष पुरस्कार अनुक्रमे वलयांकित चंद्रसाठी उज्ज्वला चंद्रशेखर धानजी, आठवचित्रेसाठी प्रज्ञा जांभेकर यांना जाहीर झाले आहेत.
वाङ्मयेतर पुरस्कारांमध्ये कविता राजधानी पुरस्कार ठाण्याचे प्रसिद्ध कवी तथा गीतकार प्रवूण दवणे, मुंबई, पालघर व ठाणे जिल्ह्यात साहित्य, पर्यावरण, शिक्षण, आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार दहिसर येथील विद्याभूषण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक नर यांना, तर संपूर्ण कोकणात साहित्य, पर्यावरण, शिक्षण क्षेत्रात योगदान करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणारा श्री. बा. कारखानीस पुरस्कार मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनील मुरारी तथा बंधू मयेकर यांना, गुरुवर्य अ. आ. देसाई स्मृती कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष मंगेश आत्माराम मस्के व ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तुकाराम विठ्ठल तथा बाळ कांदळकर यांना, राजा राजवाडे स्मृती वाङ्मयीन कार्यकर्ती पुरस्कार मुंबईच्या पुष्पा कोल्हे व मालगुंड शाखेच्या शुभदा मुळ्ये, वामनराव दाते स्मृती उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार मुंबई जिल्ह्यातील चेंबूर व रायगड जिल्ह्यातील मुरूड-जंजिरा शाखेस, ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार रायगडच्या संध्या दिवकर व सिंधुदुर्गच्या स्नेहा-माळकर फणसळकर यांना, महाविद्यालयीन लिहित्या विद्यार्थिनीला दिला जाणारा सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार पालघरच्या संस्कृती महेंद्र तांडेल यांना, उमेदीच्या गुणवंत कवीस देण्यात येणारा कवी उमाकांत कीर स्मृति काव्य पुरस्कार मालगुंडचे अमेय धोपटकर यांना आणि युवा विभागात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देण्यात येणारा कोमसाप युवा कार्यकर्ता पुरस्कार ठाण्याचे प्रवीण सोनावणे यांना जाहीर झाला आहे.
सर्व पुरस्कार विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
सन २०२४ – २५ मधील सर्व पुरस्कार प्राप्त सर्वांचे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, केंद्रीय कोषाध्यक्ष प्रकाश दळवी यांच्यासह कोकण मराठी साहित्य परिषद परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.




