रत्नागिरी पालिकेच्या दामले विद्यालयाचा शिक्षण मंत्र्यांकडून गौरव

रत्नागिरी पालिकेच्या दामले विद्यालयाचा शिक्षण मंत्र्यांकडून गौरव

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या दामले विद्यालयाचा शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज गौरव केला. तसेच पानवल आणि झरेवाडी जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहाराचा आस्वाद घेतला.

आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आलेले श्री. भुसे यांनी ‘चला शाळेत जाऊ या’ उपक्रमांतर्गत त्यांनी दामले विद्यालयासह पानवल होरंबेवाडी आणि झरेवाडीच्या जिल्हा परिषद शाळांनाही भेट दिली. दामले विद्यालयाच्या भेट दिल्यानंतर ते म्हणाले, दामले विद्यालयाने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि गुणवत्तावाढीच्या क्षेत्रात मिळविलेले यश थक्क करणारे आहे. विद्यार्थ्यांमधील ही गुणवत्ता आणि शाळेची उत्तुंग प्रगती प्रत्यक्ष अनुभवणे हे माझे भाग्यच आहे.

दामले विद्यालयात थेट वर्गात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्याची लकेर उमटली. यावेळी त्यांनी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली.

या दौऱ्यात शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या १५ गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. अध्यापनात उत्कृष्ट योगदान असलेल्या राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शिक्षकांचाही त्यांनी सन्मान केला. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कला व कार्यानुभव प्रदर्शनाची मंत्र्यांनी बारकाईने पाहणी केली आणि बालवैज्ञानिकांच्या कल्पकतेला दाद दिली.

राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण विभागाच्या भूमिका अभिनय स्पर्धेत विभागीय पातळीवर यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी मूल्यशिक्षणावर आधारित एक प्रभावी नाटिका सादर केली. चिमुकल्यांच्या अभिनयाने आणि संवेदनशील सादरीकरणाने उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. यावेळी मुख्याध्यापक भगवान मोटे यांनी शाळेचा सातत्याने वाढणारा पट, शैक्षणिक गुणवत्ता आणि सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांची माहिती पीपीटीच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडली.

शिक्षण मंत्र्यांनी पानवल आणि झरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शालेय पोषण आहाराचा दर्जा पाहिला आणि प्रत्यक्षात त्यांनी तो अनुभवला. तेथील स्वच्छता पाहिली.

जिल्हा परिषद शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे, परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे, शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, कोकण बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, सचिव पुनिता गुरव, डाएटचे प्राचार्य सुशील शिवलकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा कदम-जगदाळे, योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, उपशिक्षणाधिकारी सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी डुबल आणि नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुधाकर मरकुटे यांच्यासह शिक्षण विभागातील प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply