रत्नागिरी : राज्यातील पतसंस्थांच्या ठेव संरक्षणासाठी शासनाने भरीव योगदान करावे, अशी मागणी राज्य फेडरेशनच्या येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. दर महिन्यात संस्थेने नवीन १० युवकांना संस्थेबरोबर संलग्न करण्याचे आवाहनही करण्यात आले.
राज्य पतसंस्था फेडरेशनची सभा रत्नागिरीत अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात झाली. सभेला महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांतील विविध संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
फेडरेशन च्या पोट नियमात अनेक बदल सभेने मंजूर केले. फेडरेशनचे वर्गीकरण अन्य संस्था प्रकारात करण्यासाठी सभेने मंजुरी दिली. योग्य यंत्रणा प्रभावी पद्धतीने कार्यान्वित करावी तोपर्यंत अंशदान भरण्याची सक्ती संस्थांवर करू नये, अशा आशयाचा ठराव संमत करण्यात आला.
पत संस्थांना क्रेडिट इन्स्टिट्यूशन म्हणून मान्यता देण्यासाठी केंद्रीय कायद्यातील तरतुदीचा वापर रिझर्व्ह बँकेने करावा. पतसंस्थांचे वाढते व्यवहार लक्षात घेऊन पतसंस्थांची श्रेणी ठरवून वर्गवारी करावी व पतसंस्थांच्या वाढीसाठी पूरक धोरण ठरवण्यात यावे, यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
पतसंस्थांसाठी प्रशिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशिक्षणासाठी सर्वंकष अभ्यासक्रम तयार करण्याची तसेच संस्थांच्या व्यवहारांचे डॉक्युमेंटेशन कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी अर्ज, करार, रोखे इत्यादी कागदपत्राचे आदर्श नमुने पुस्तिका दोन महिन्यांत प्रकाशित करण्यात येईल, अशी घोषणा फेडरेशनचे अध्यक्ष श्री. पटवर्धन यांनी केली.
संस्थांनी आपली प्रतिमा अधिक विश्वासार्ह, शिस्तप्रिय, करण्यासाठी सजग राहावे, युवावर्गाला संस्थांशी संलग्न करण्यासाठी उपक्रम राबवावेत प्रत्येक महिन्यात किमान १० नवीन युवक संस्थेशी जोडण्याचा कार्यक्रम सर्व संस्थांनी अग्रक्रमाने राबवावा, असे आवाहनही अध्यक्षांनी केले.
वार्षिक सभा आणि अभ्यासवर्गाला फेडरेशन महासचिव राजोबा सर, उपाध्यक्ष डॉ. शिंगी, माजी अध्यक्ष काकासाहेब कोयटे, डॉ. भोसले , श्री. छाबडा, प्रा. श्री आकरे, श्री. वाजे, श्री. तांबेकर, श्री. बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. लवांदे, विभागीय फेडरेशनचे संतोष थेराडे, सिंधुदुर्ग पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. राऊळ, डीसीसी बँकेचे संचालक सचिन भिंगार्डे, शिवकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष गोरखनाथ चव्हाण, छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष लेंभे, राजापूर कुणबी संस्थेचे अध्यक्ष मांडवकर, नागपूर पतसंस्था जिल्हा फेडरेशन अध्यक्ष राजेंद्र घाटे यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांनी अभ्यासवर्गाचे उद्घाटन केले. जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अभय माटे, डॉ. सोपान शिंदे, सुहास पाटणकर यांनी अभ्यासवर्गाला मार्गदर्शन केले. डीपीडीपी कायदा, डेटा संरक्षण याबाबत प्रथमच मार्गदर्शनपर व्याख्यान अभय माटे यांनी दिले.
अनेक प्रायोजकांनी आपापली सॉफ्टवेअर अॅप, विमा योजना याबाबत प्रतिनिधींना माहिती दिली. या आयोजनासाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे भरीव सहकार्य लाभले. रत्नागिरीत ऐन श्रावण मासात सहकाराचा महामेळ अतिशय उत्साहात आणि आणि उत्तम नियोजनात पार पाडला.


