Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

मतदान जनजागृती सायकल फेरीला रत्नागिरीत प्रतिसाद

Advertisements

लोकसभा निवडणूक २०२४ वृत्त

रत्नागिरी : रत्नागिरी प्रांत कार्यालयाने मतदानाच्या जनजागृतीसाठी आज रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबच्या सहकार्याने आयोजित केलेल्या सायकल फेरीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

मी मतदान करणार आहे, तुम्हीही करा, तुमच्या शेजाऱ्यांनाही करायला प्रोत्साहित करा. ती आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे’, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी यावेळी केले.

येथील पोलीस संचलन मैदानात आज सकाळी फेरीसाठी सायक्लिस्ट आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या फेरीला प्रोत्साहित करण्यासाठी पोलीस दलाचा बँड तैनात होता. तो देशप्रेमावर आधारित गीताची धून वाजवत होता. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे डॉ. नितीन सनगर आणि सायक्लिस्ट उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, मी जेथे जातो, तेथे सर्वप्रथम माझे मतदानाचे ओळखपत्र करून घेतो. येथेही ओळखपत्र घेतले आहे. यंदाच्या निवडणुकीत मी मतदान करणार आहे. तुम्हीही करा. त्याचबरोबर तुमच्या शेजाऱ्यांना आणि तरुण मतदारांना मतदान करण्यासाठी सांगा.

उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी स्वागत करून प्रास्ताविकात मतदान जनजागृतीपर सायकल फेरीचा उद्देश सांगितला. त्यानंतर त्यांनी मतदान करण्याबाबत उपस्थित सर्वांना शपथ दिली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी, कर्मचारी, सायक्लिस्ट यांनी फलकावर मतदान जनजागृतीपर संदेश लिहून स्वाक्षरी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार, पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी हिरवा झेंडा दाखवून सायकल फेरीला प्रारंभ केला.

पोलीस मैदान ते शासकीय रुग्णालय, तेली आळी- मांडवी बीच- टिळक आळी-गोखले नाका- मारुती मंदिर ते पोलीस कर्मचारी वसाहत या मार्गावरून ही सायकल फेरी निघाली. पोलीस वसाहतीत आल्यानंतर फेरीचा सांगता झाली.

फेरीत सहभागी झालेल्या सायकलिस्ट श्रद्धा रहाटे, प्रतीकेश बेंद्रे, सांची कांबळे आणि अपर जिल्हाधिकारी श्री. बर्गे, उपमुख्य कार्यकारी श्री. देसाई यांना प्रातानिधिक स्वरूपात प्रशस्तीपत्र देण्यात आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version