रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरुषांपेक्षा २१ हजार महिला मतदार अधिक

लोकसभा निवडणूक २०२४ वृत्त

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या २१ हजार ४८६ ने अधिक आहे. या मतदारसंघाने आपली परंपरा जपली आहे.

मतदारसंघात येत्या ७ मे रोजी निवडणूक होत आहे. त्यादृष्टीने निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. मतदारसंघात १९४२ मतदान केंद्रांवर १४ लाख ३८ हजार ४७१ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ७ लाख ८ हजार ४८७ पुरुष आणि ७ लाख २९ हजार ९७३ महिला मतदार आहेत. दिव्यांग मतदारांची संख्या ११ हजार २६१ आहे, तर ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या २६ हजार ४२६ आहे.

जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात १२ एप्रिल ते १९ एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. अर्जांची छाननी २० एप्रिल रोजी होईल. नंतर २२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या मतदारसंघात
या मतदारसंघात ३२ भरारी पथके तैनात ठेवण्यात येणार असून १६ चेकपोस्ट २४ तास सुरू राहतील अशी माहिती त्यांनी दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेसाठी चार हजार १५१ पोलीस कर्मचाऱ्यांची गरज आहे. तितके पोलीस कर्मचारी जिल्ह्यात नसल्याने बाहेरून कुमक मागवावी लागेल. बाहेरून तीन हजार १३५ पोलीस मागवावे लागतील. राज्य राखीव दलाची दोन पथके, केंद्रीय राखीव दलाची दोन पथके आणि दोन हजार ११३ होमगार्ड मागवावे लागणार आहेत. सायबर सेल सोशल मीडियावर करडी नजर ठेवणार आहे. जनतेमध्ये मतदान करण्याचा आत्मविश्वास वाढावा यासाठी रूट मार्च आणि फ्लॅग मार्च काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply