एनसीसी कॅडेट्सच्या २५० किलोमीटर साहसी नौकानयन मोहिमेला रत्नागिरीत प्रारंभ

एनसीसी कॅडेट्सच्या २५० किलोमीटर साहसी नौकानयन मोहिमेला रत्नागिरीत प्रारंभ

रत्नागिरी : मेन्यू २७ या राष्ट्रीय स्तरावरच्या साहसी खुल्या सागरी नौकानयन मोहिमेचा आज रत्नागिरीतून उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. कोल्हापूर एनसीसी मुख्यालयाचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर आणि सेकंड महाराष्ट्र नेव्हल युनिटचे कमांडिंग ऑफिसर कमांडर रामानुज दीक्षित यांनी हिरवा झेंडा दाखवून या मोहिमेची औपचारिक सुरुवात केली.

कस लावणाऱ्या चाचणीतून यासाठी ६० गुणवंत एनसीसी कॅडेट्स निवडण्यात आले असून, त्यात २५ मुली आणि ३५ मुलांचा समावेश आहे. त्यांनी १० दिवसांच्या विशेष पूर्वतयारी शिबिरात खडतर प्रशिक्षणही पूर्ण केलं आहे. हे कॅडेट्स २७ फूट लांबीच्या पारंपरिक 'डीके व्हेलर' नौकांमधून रत्नागिरी ते पालशेत आणि परतीचा असा २५० किलोमीटरचा प्रवास ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करणार आहेत. कोकण ज्ञानतरंग ही या मोहिमेची मूळ संकल्पना असून, ही मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक सागरी सामर्थ्याला मानवंदना देणार आहे. 'मोस्ट एंटरप्रायजिंग नेव्हल युनिट' अर्थात MENU 27 या एनसीसीच्या राष्ट्रीय स्तरावरील मानाच्या पंतप्रधान रोलिंग ट्रॉफी स्पर्धेचा हा एक महत्त्वाचा टप्पा असून, या मोहिमेच्या यशामुळे महाराष्ट्र एनसीसी डायरेक्टोरेटला प्रतिष्ठेचे गुण प्राप्त होणार आहेत.

'ही मोहीम केवळ एका स्पर्धेपुरती मर्यादित नसून, तरुणाईमध्ये नेतृत्वगुण, धाडस आणि अढळ शिस्त निर्माण करणारी जीवनशाळा आहे. खुल्या समुद्रातल्या उसळत्या लाटांशी सामना करताना हे कॅडेट्स केवळ कणखर बनणार नाहीत, तर त्यांना कोकणाच्या समृद्ध व पराक्रमी सागरी इतिहासाची प्रत्यक्ष अनुभूतीही येईल,' असं ब्रिगेडियर आर. के. पैठणकर म्हणाले.

'हे शूर कॅडेट्स किनाऱ्यावरच्या गावांमध्ये जाऊन तटीय सुरक्षा आणि सागरी स्वच्छतेचा जनजागृतीपर संदेशही तळागाळापर्यंत पोहोचवतील,' असं कमांडर रामानुज दीक्षित यांनी सांगितलं.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply