रत्नागिरीतून ‘मेन्यू २७’ सागरी मोहिमेचा थाटात प्रारंभ

रत्नागिरीतून ‘मेन्यू २७’ सागरी मोहिमेचा थाटात प्रारंभ

रत्नागिरी : रत्नागिरीतून ‘मेन्यू २७’ सागरी मोहिमेचा आज थाटात प्रारंभ झाला. मोहिमेमध्ये ३५ मुलींसह ६० एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले आहेत.

युवाशक्ती, मराठा आरमाराचा देदीप्यमान सागरी वारसा आणि लष्करी शिस्तीचे दर्शन घडवत, २ महाराष्ट्र नवल युनिट एनसीसी (रत्नागिरी) यांच्या वतीने आयोजित ‘मेन्यू २७’ या राष्ट्रीय स्तरावरील खुल्या समुद्रातील नौकानयन मोहिमेचा आज येथील अल्ट्राटेक जेटीवरून अत्यंत उत्साहात प्रारंभ झाला. कोल्हापूर एनसीसी ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर यांच्या हस्ते आणि २ महाराष्ट्र नवल युनिटचे कमांडिंग ऑफिसर कमांडर रामंजुल दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी भारतीय नौदल, तटरक्षक दल, जिल्हा प्रशासन, पोर्ट ऑफिस आणि सीमाशुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान रोलिंग ट्रॉफीच्या ‘मोस्ट एंटरप्रायझिंग नेवल युनिट’ या राष्ट्रीय स्पर्धेचा भाग असलेल्या या मोहिमेत संपूर्ण महाराष्ट्रातून निवडलेले ६० उत्कृष्ट नौदल कॅडेट्स सहभागी झाले असून त्यात ३५ युवती आणि २५ युवकांचा समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या १० दिवसांच्या शिबिरात सागरी नेव्हिगेशन, बोट पुलिंग, रिगिंग आणि आपत्कालीन बचावाचे खडतर प्रशिक्षण घेतलेले हे कॅडेट्स २७ फूट लांबीच्या तीन डीके व्हेलर नौकांमधून रत्नागिरी ते पालशेत आणि परतीचा असा एकूण २५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करतील. या संपूर्ण मोहिमेदरम्यान तिवरी, जयगड, बोऱ्या आणि पालशेत येथे या नौकांचा मुक्काम राहणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा आरमाराच्या शौर्याला अभिवादन करत “कोकण ज्ञान तरंग” ही संकल्पना आणि “ज्ञानाच्या लाटा, प्रगतीच्या वाटा” या ब्रीदवाक्यासह राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेत कॅडेट्स किनाऱ्यावरील गावांमध्ये तटीय सुरक्षा, सागरी प्रदूषण आणि समुद्र स्वच्छतेविषयी रॅली व पथनाट्यांतून जनजागृती करणार आहेत. कॅडेट्सच्या सुरक्षेसाठी तीन विशेष बचाव नौका ताफ्यासोबत तैनात असून वेस्टर्न नेवल कमांड, कोस्ट गार्ड स्टेशन रत्नागिरी, एमआरसीसी मुंबई आणि स्थानिक प्रशासनाचे भक्कम सहकार्य या मोहिमेला लाभले आहे.

तरुणांमधील नेतृत्वगुण, साहस आणि शिस्त घडवणारी ही मोहीम असून कॅडेट्स कोकण किनारपट्टीवर पर्यावरण आणि सुरक्षेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवतील, असा विश्वास यावेळी उपस्थित वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply