गुढीपाडवा स्वागतयात्रेसाठी व्यवस्थापन समिती स्थापन करणार

रत्नागिरी : येथे गुढीपाडव्याला काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रेच्या व्यवस्थापनासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे.

रत्नागिरीत गेल्या १९ वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येते. यंदासुद्धा ९ एप्रिल रोजी ग्राममंदिर भैरी मंदिर ते समाजमंदिर पतितपावन मंदिर या मार्गावर जल्लोषात स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. यासंबंधीची पहिली बैठक पतितपावन मंदिरात झाली. यावेळी देवस्थान समिती, विविध ज्ञाती संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यंदा प्रथमच व्यवस्थापन समिती तयार करण्यात येणार आहे.

यात्रेत हिंदू धर्मातील सर्व पंथांमधील आबालवृद्ध मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतील. सुमारे १३० मंदिर संस्था, ज्ञाती संस्था, नवरात्रोत्सव मंडळांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत.

डोंबिवलीचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीत २००५ मध्ये पहिली स्वागयात्रा सुरू झाली. हिंदुत्वाचा जयघोष करण्यासाठी ही यात्रा जल्लोषात निघाली आणि दिवसेंदिवस या यात्रेत गर्दीचे उच्चांक मोडले जात आहेत. यंदा अधिकाधिक ज्ञातीसंस्था, आबालवृद्धांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी केले. पुढील बैठक ३१ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता पतितपावन मंदिरात होणार आहे. तसेच ७ एप्रिलला सायंकाळी दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे. स्वागतयात्रेत रत्नागिरी शहरासह कुवारबाव, नाचणे, मिरजोळे, भाट्ये, फणसोप, मिऱ्या, शिरगाव, कर्ला, जुवे, आंबेशेत अशा जवळच्या विविध गावांतील हिंदू बंधू-भगिनी सहभागी होणार आहेत.

श्री भैरी मंदिरात गुढी उभी केल्यानंतर सकाळी ९ वाजता स्वागयात्रेला सुरवात होणार आहे. त्याच वेळी मारुती मंदिर येथून स्वागतयात्रा निघणार आहे. त्यानंतर जयस्तंभ येथे दोन्ही यात्रांचे एकत्रीकरण होणार असून तेथून पुढे पतितपावन मंदिरात यात्रा पोहोचेल. झाडगाव येथील भैरी मंदिर येथून प्रारंभ झाल्यानंतर स्वागतयात्रा, कॉंग्रेस भवन, गोखले नाकामार्गे जयस्तंभ येथे येईल. येथे ही यात्रा आणि मारुती मंदिरपासून निघालेली स्वागतयात्रा एकत्र होऊन राम आळी मार्गे, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिरात पोहोचणार आहे. या मंदिरात हिंदु धर्माची शपथ घेऊन यात्रेची सांगता करण्यात येणार आहे.

या बैठकीत श्री देव भैरी मंदिर देवस्थानचे उपाध्यक्ष राजन जोशी, पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे, विश्वस्त अॅड. बाबा परुळेकर, राजेश आयरे, उमेश खंडकर, कौस्तुभ सावंत, संतोष पावरी, आनंद मराठे, रवींद्र भोवड, चंद्रकांत राऊळ, राकेश नलावडे, संजय जोशी, समीर करमरकर, जितेंद्र शिवगण, बावा नाचणकर, राजन फाळके, राकेश मयेकर, बी. टी. मोरे, तनया शिवलकर, दीपक सुर्वे, नीला दात्ये, विकास मयेकर, वरुण पंडित, गजानन करमरकर, रमेश सुर्वे, नीलेश शाह, दर्शन जाधव, ओंकार फडके, स्वप्नील सावंत, श्रीकांत ढालकर, सौ. ढालकर, शितोळे, अमेय रायकर, दादा ढेकणे, महेश नवेले, यांच्यासमवेत शहरातील विविध देवस्थानांचे अध्यक्ष, पदाधिकारी, जैन समाजासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply