रत्नागिरी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६अंतर्गत खामशेत (ता. गुहागर) ग्रामपंचायतीला राज्यात द्वितीय क्रमांकाचा बहुमान मिळाला असून, नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख उपक्रमांच्या जोरावर खामशेत ग्रामपंचायतीने ग्रामविकासात उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.
या ऐतिहासिक यशामुळे गुहागर तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. नाशिक येथील या पुरस्कार वितरण सोहळ्यास ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, खामशेतचे लोकनियुक्त सरपंच मंगेश सोलकर, गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती नीलेश सुर्वे यांनी हा पुरस्कार अत्यंत अभिमानाने स्वीकारला.
या गौरवशाली सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, गुहागरचे गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे, खामशेतचे प्रशासक चंद्रकांत कारंडे, ग्रामसेवक श्री. मोहिरे यांच्यासह साईनाथ बागुल व कृष्णदेव कदम उपस्थित होते.
खामशेत ग्रामपंचायतीने स्वच्छता, शाश्वत पाणीपुरवठा, मूलभूत सुविधांचा विकास, पारदर्शक प्रशासन आणि विविध शासकीय कल्याणकारी योजनांची तळागाळातील घटकांपर्यंत केलेली यशस्वी अंमलबजावणी या सर्व निकषांवर राज्यात आघाडी घेतली आहे. सामूहिक लोकसहभाग आणि प्रशासकीय नियोजनाच्या जोरावर गावाने ग्रामविकासाचा एक नवा आदर्श उभा केला असून, त्याचीच पावती म्हणून राज्य पातळीवर या कामगिरीची दखल घेण्यात आली आहे.
Follow Kokan Media on Social Media

