सावंतवाडी : कृषकव्हेंचर कंपनीच्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले.
बांदा (ता. सावंतवाडी) येथे कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनीच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कंपनीने सातत्याने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ आणि रास्त दर मिळणे, तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती व आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांच्या उत्पादनाला योग्य मूल्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
यावेळी भाजप युवा नेते विशाल परब म्हणाले, शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविणे, त्यांच्या शेतमालाचे योग्य नियोजन करणे आणि उत्पादित मालाला चांगला भाव मिळवून देणे या उद्देशाने दयानंद कुबल यांनी कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे. शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या दृष्टीने कंपनीचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून, कंपनीचे कार्य भविष्यात कोकणातील सर्व भागांत पोहोचेल, असा विश्वास आहे.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची खरेदी करून त्याला योग्य दर मिळवून देणे, कृषी उत्पादनांसाठी सक्षम बाजारपेठ उपलब्ध करून देणे, तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि कृषीविषयक मार्गदर्शन पुरविणे, ही कंपनीची प्रमुख उद्दिष्टे आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना विविध शासकीय व कृषीपूरक योजनांचा लाभ मिळवून देणे, गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा, रोपे व शेतीसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे, तसेच उत्पादनाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन करणे, यावर कंपनी भर देणार आहे.
शेतकरी, कृषी उत्पादक आणि बाजारपेठ यांच्यात विश्वासार्ह संबंध निर्माण करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कंपनीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे बांदा परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी अधिक चांगल्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कार्यक्रमाला सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, बांदा पंचायत समिती सदस्या ऋतिका नाईक, तांबोळी पंचायत समिती सदस्या प्रियांका देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्या तथा भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतिब, भाजप बांदा मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, वाफोली उपसरपंच विनेश गवस, कास सरपंच प्रवीण पंडित, डिंगणेचे माजी उपसरपंच जयेश सावंत, समर्थ नर्सरीचे अर्जुन मोरजकर, प्रवीण देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
Follow Kokan Media on Social Media

