रत्नागिरी : येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची बारटक्के इन्स्टिट्यूट आणि एव्हीपी फ्युचरटेक प्रा. लि. यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योगाभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण मिळावे, तसेच बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात त्यांना रोजगारासाठी सक्षम बनवावे, या उद्देशाने झालेल्या या करारामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर, प्रकल्पाधारित प्रशिक्षण तसेच उद्योगाच्या गरजेनुसार कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील अंतर कमी करून विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी तयार करण्याचा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या भागीदारीअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कालावधीत प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. एआय टूल्स, जनरेटिव्ह एआय, डाटा अॅनालिटिक्स, ऑटोमेशन, डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या तांत्रिक तसेच समस्या सोडविण्याच्या क्षमतेचा विकास केला जाणार आहे.
एव्हीपी फ्युचरटेक प्रा. लि. मधील अनुभवी तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मार्गदर्शक विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतील. उद्योगातील बदलत्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून प्रशिक्षणामध्ये आवश्यक बदल करण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष आणि जबाबदार वापर करण्याचे कौशल्य आत्मसात करता येणार आहे. या उपक्रमासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी तसेच बारटक्के इन्स्टिट्यूट शालेय समितीच्या अध्यक्षा डॉ. कल्पना मेहता आणि सर्व समिती सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.
बारटक्के इन्स्टिट्यूटच्या समन्वयक सौ. अनुजा घारपुरे म्हणाल्या, आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाधारित युगात केवळ पारंपरिक शिक्षण पुरेसे नाही. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकणे ही काळाची गरज आहे. एव्हीपी फ्युचरटेकसोबतच्या या करारामुळे विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजेनुसार कौशल्ये विकसित करण्याची आणि त्यांच्या करिअरला नवी दिशा देण्याची संधी मिळणार आहे.
फ्युचरटेकचे संचालक आविष्कार कांबळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी कोणतेही एक तंत्रज्ञान आपल्या शिक्षणात, कामात आणि नावीन्यपूर्ण विचारांमध्ये कसे वापरता येईल, हे शिकणे आवश्यक आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण विचार आणि उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रत्नागिरी शहरातील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत.
Follow Kokan Media on Social Media

