जनूभाऊ निमकर यांच्या तैलचित्राचे चिपळूणला अनावरण

चिपळूण : स्वदेश हितचिंतक नाटक मंडळींचे मालक आणि दिग्दर्शक कै. जनूभाऊ निमकर यांच्या तैलचित्राचे चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात अनावरण करण्यात आले.

संगीतसूर्य केशवराव भोसले यांना रंगभूमीवर आणणारे ‘स्वदेश हितचिंतक नाटक मंडळी’चे मालक व दिग्दर्शक ‘अपरान्तपुत्र’ कै. जनुभाऊ निमकर यांच्या तैलचित्राचे अनावरण नामवंत अभिनेत्री संपदा कुळकर्णी-जोगळेकर आणि जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेचे माजी अध्यक्ष सामाजिक क्षेत्रात अग्रेसर प्रथितयश डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संपदा कुळकर्णी-जोगळेकर म्हणाल्या, जांभेकर सभागृहातील वातावरण सकारात्मक आहे. सभागृहाचे कोंदण काहीतरी आपल्याला सांगू पाहते आहे. इथल्या कलादालनाचा अनुभवलेला हा प्रवास खूप छान आहे. कै. जनूभाऊ निमकर यांचे तैलचित्र अतिशय देखणे आहे. त्या काळात एखादी संपूर्ण नाट्य संस्था स्वत:च्या खांद्यावर धारण करणारे डोळे या तैलचित्रात दाखवल्याप्रमाणेच असू शकतात, असा विश्वास देणारे हे तैलचित्र आहे.

डॉ. चंद्रशेखर निमकर म्हणाले, एका नात्याने जनूभाऊ निमकर माझे आजोबा होते. कोकणातील महनीय रत्नांचा दुर्मीळ आणि दुर्लक्षित इतिहास वाचनालयाने संग्रहित केला आहे. भविष्यात तो ध्वनिमुद्रित माध्यमात आणण्यासाठी प्रयत्न करू या. नामवंत चित्रकार गणेश कळसकर यांनी तैलचित्र निर्मितीची कहाणी सांगितली.

इतिहासाचे व्यासंगी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी जनुभाऊ निमकर यांच्याविषयी सांगितले की, त्याकाळी सामान्य घरातील माणसे नाटकात मोठी झाल्याचे दिसते. देशपांडे यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जडणघडणीतील जनूभाऊंच्या योगदानाची विस्तृत माहिती दिली.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, माधव भोळे, माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी उपस्थित होते. वाचनालयाच्या प्रथेप्रमाणे यावेळी उपरणे, ग्रंथभेट आणि श्रीफळ देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी अरविंद कोकजे, माधव भोळे, उमेश कुळकर्णी, सुरेंद्र कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा दामले यांनी केले. कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply