साठरे बांबरच्या सुनील यादवला आरएचपी फाउंडेशनकडून व्हीलचेअर

रत्नागिरी : साठरे बांबर (ता. रत्नागिरी) येथील सुनील चंद्रकांत यादव ( वय २८ वर्षे) याला आरएचपी फाउंडेशनतर्फे नवीन व्हीलचेअर देण्यात आली.

सुनील यादव दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर मोलमजुरी करत होता. २१ वर्षांचा असताना झाडावरून खाली पडला. त्यामुळे त्याच्या पाठीच्या मणक्याला मार लागला. त्याला लगेच रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर आधी उपचारांसाठी कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात, तर त्यानंतर मुंबईच्या केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्या मणक्याचे ऑपरेशन झाले; पण त्यानंतर कमरेपासून खालील भागाच्या संवेदना गेल्या. मूत्रविसर्जनाचे नियंत्रण गेले. सात वर्षांपासून तो जागेवरच आहे. चालता येत नाही.

आई सौ. चंद्रकला यांच्या मदतीने घरीच तो सर्व करत होता. दोन वर्षांपूर्वी आईचे अल्पशा आजाराने निधन झाले. आता घरी वडील आणि सुनील दोघेच असतात. त्यामुळे सर्व जबाबदारी वडिलांवरच आली. आहे. वडील गवंड्याच्या हाताखाली काम करून उपजीविका करतात. सकाळी लवकर उठून सुनीलचे आवरतात. जेवण बनवून ठेवतात व कामाला जातात.

केईएममधून सुनीलला एक व्हीलचेअर मिळाली होती; पण ती नादुरुस्त झाली. दरम्यान, हँडीकॅप सर्टिफिकेट काढताना समीर नाकाडेंशी त्याची ओळख झाली आणि आरएचपी फाउंडेशनची माहिती मिळाली.

संस्थेत त्याने नावनोंदणी केली तेव्हा नवीन व्हीलचेअरची मागणी केली होती. फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक करीम नाकाडे यांनी सुनीलची सर्व माहिती घेतली आणि व्हीलचेअरसाठी डोनर मिळवून देण्याची ग्वाही दिली.

श्री. नाकाडे यांचे मित्र जयंत चुणेकर यांनी व्हीलचेअर द्यायचे कबूल केले. त्यांच्या अनुभूती या ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन आणि समुपदेशन कार्याला ६ वर्षे पूर्ण झाली. त्यातून होणारे अर्थार्जन ते समाजकार्यासाठी वापरतात. याचाच एक भाग म्हणून सुनीलला त्यांनी सोयीस्कर फोल्डेबल अशी व्हीलचेअर दिली. या वेळी सादिक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे, प्रिया बेर्डे, डॉ. मुस्कान नाकाडे आदी उपस्थित होते.

व्हीलचेअर दिल्याबद्दल सुनीलच्या वडिलांनी आरएचपी फाउंडेशनचे विशेष आभार मानले.

अशा प्रकारचे अनेक गरजू दिव्यांग आहेत, ज्यांना सोयीस्कर व्हीलचेअरची गरज आहे. कोणाला अशी मदत करावयाची असल्यास नाकाडे (8329534979) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply