वालावल (ता. कुडाळ) : प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. अशोक वासुदेव प्रभू यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्वरसिंधुरत्न हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. शुभम राणे आणि दत्तराज च्यारी यांची यंदाच्या स्वरसिंधुरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
कोकणातील उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने २०१९ साली डॉ. अशोक प्रभू यांनी २०१९ साली स्वरसिंधुरत्न स्पर्धेची सुरुवात केली होती. स्पर्धेची आणि त्यांची आठवण म्हणून आता त्यांच्या स्मृतिदिनी ही स्पर्धा वालावल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील लक्ष्मीनारायण मंदिरात आयोजित केली जाते. यंदाची स्पर्धा १३ मे २०२४ रोजी पार पडली.
२०१९ साली या स्पर्धेचे स्वरूप अभंग व भक्तिगीत गायन असे ठेवण्यात आले होते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हा जगभरातील संगीताचा पाया मानला जातो. त्यामुळे २०२२ साली या स्पर्धेचे स्वरूप बदलून ही स्पर्धा फक्त हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी खुली करण्यात आली. मागील दोन वर्षे ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरती मर्यादित होती. परंतु या वर्षी ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा आणि गोवा राज्य या दोन विभागांसाठीही खुली करण्यात आली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि गोवा या विभागातून या वर्षी दोन गटांतून एकूण ३० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी २२ स्पर्धकांनी प्रत्यक्ष स्पर्धेत भाग घेऊन सादरीकरण केले.
यंदा लहान गटातून कु. शुभम राणे आणि मोठ्या गटातून दत्तराज च्यारी यांनी ही स्पर्धा जिंकून स्वरसिंधुरत्न किताब प्राप्त केला. लहान गटात एकूण १५, तर मोठ्या गटात सात स्पर्धकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे परीक्षण प्रदीप धोंड आणि स्वप्नील गोरे यांनी केले. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना सिद्धेश कुटे, मंगेश मेस्त्री, समर्थ प्रभू-केळुस्कर यांनी साथसंगत केली. स्पर्धेचे आयोजन श्री देव लक्ष्मी नारायण स्थानिक सल्लागार उपसमिती वालावल आणि श्री देव लक्ष्मीनारायण भक्त यांनी केले होते. प्राचार्य प्रशांत धोंड यांनी या स्पर्धेचे संयोजन केले.
१७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता आषाढी एकादशीच्या दिवशी कोकणातील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वालावलच्या श्री देव लक्ष्मी नारायण देवस्थानाच्या सभामंडपात स्वरसिंधुरत्न २०२४ या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात स्वरसिंधुरत्न पुरस्कार विजेते आपली गायनसेवा सादर करणार आहेत. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून श्रवणानंद घ्यावा, असे आवाहन प्राचार्य प्रशांत धोंड यांनी केले आहे.

