लोकसभा निवडणूक २०२४ वृत्त
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे नारायण राणे यांच्यासह सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी, आज (१९ एप्रिल) रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते आणि विद्यमान केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी महायुतीकडून अर्ज सादर केला. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी तो स्वीकारला. अर्ज सादर करताना राणे यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर, शिवसेनेचे किरण सामंत उपस्थित होते.
अर्ज भरण्याच्या आधी रत्नागिरी शहरातील मारुती मंदिरपासून मोठी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक जयस्तंभ येथे आल्यावर प्रचारसभा झाली. ही मिरवणूक आणि प्रचारसभेत भाजप, शिवसेना शिंदे गटासह महायुतीतील घटक पक्षांचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच गोव्यातले प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रमुख नेत्यांमध्ये डॉ. प्रमोद सावंत, उद्योगमंत्री उदय सामंत, दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम आदींचा समावेश होता. आपण अडीच ते तीन लाखाचे मताधिक्य घेऊन निवडून येऊ, असा विश्वास राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, आज एकूण सात उमेदवारांनी अर्ज सादर केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि विद्यमान खासदार विनायक भाऊराव राऊत यांनी आज पुन्हा एकदा अर्ज दाखल केला. त्यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या विनायक लवू राऊत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर केला. मारुती रामचंद्र जोशी यांनी वंचित बहुजन आघाडीकडून, राजेंद्र लहू आयरे यांनी बहुजन समाज पक्षाकडून, अशोक गंगाराम पवार यांनी बहुजन मुक्ती पार्टीकडून, तर सुरेश गोविंदराव शिंदे यांनी सैनिक समाज पक्षाकडून अर्ज सादर केला आहे. या मतदारसंघात आजपर्यंत एकूण नऊ उमेदवारांचे अर्ज सादर झाले आहेत.
शुक्रवारी, १९ एप्रिल २०२४ रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करताना विविध उमेदवार







कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

