दापोली : परदेशी स्पर्धकांच्या उपस्थितीत दापोली विंटर सायक्लोथॉन सहाव्या पर्वाला रविवारी, दि. १० नोव्हेंबर रोजी उत्साहात सुरवात झाली. यामध्ये महाराष्ट्रातील, इतर राज्यातील, परदेशातील वय ८ ते ६४ वयोगटातील १२० स्पर्धक आपल्या कुटुंबीयांसमवेत सहभागी झाले होते.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. ते लोकांना पटावेत, सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे दापोली विंटर सायक्लोथॉनच्या सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात दापोली, चिखलगाव, दाभोळ, पंचनदी, गोमराई, बुरोंडी, लाडघर, कर्दे, मुरूड, सालदुरे, आसूद आणि परत दापोली या समुद्रकिनाऱ्यावरील ६५ किमी मार्गावर कोकणातील निसर्गसौंदर्य अनुभवत सर्वांनी सायकल चालवली. मार्गावर असलेल्या अनेक पर्यटन ठिकाणांना भेटी दिल्या, कोकणी स्थानिक पदार्थ, मासे खाल्ले.
एक हजार मीटरहून अधिक चढउतार असणाऱ्या या आव्हानात्मक हॉर्नबिल सिनिक रूट मार्गावर सायकल चालवणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. त्यामध्ये मलेशियातून आलेले ६४ वर्षीय एस सांगरन, ६० हून अधिक वयोगटातील नितीन मुळे (लोहगाव), राजू औटी (पुणे), मेजर दीपक जांभळे (सासवड), विनायक वैद्य (खेड), वर्षा येवले (कल्याण), रोहित आंबेकर आणि वांडरर्स टीम (पनवेल), टँडम सायकलने पूर्ण करणारे आनंद ठाकर (पाषाण), सिंगल गिअर सायकलने मॅरेथॉन पूर्ण करणारे नीलेश गावकर (कणकवली, सिंधुदुर्ग) यांना खास सन्मानचिन्ह देण्यात आले.
तेरा वर्षीय आयुष शिंदे, अवधूत पाते, वरद कदम, स्वराज मांजरे, साईप्रसाद वराडकर, आयुष जोशी, प्रमोद जैन हे ६५ किमी पूर्ण करणारे लहान सायकलस्वार ठरले. या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी काहीजण सायकल चालवत मुंबई, पुण्याहून आले होते. सायकल प्रवास करत दापोलीत पोहोचलेले इंग्लंड येथील डेव्हिड आणि जेट यांनीही स्पर्धकांसोबत सायकल चालवत त्यांचे अनुभव कथन केले.
या सायक्लोथॉनच्या निमित्ताने दापोलीचे सौंदर्य कुटुंबासह पाहता आल्यामुळे बाहेरगावाहून आलेले सर्व रायडर खुश होते. अनेकांनी २ ते ६ दिवस मुक्काम करून स्थानिक वस्तूंची खरेदी केली, भटकंती केली.
सायक्लोथॉनसाठी दापोली एज्युकेशन सोसायटी, दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज टीम, दापोली तालुका आरोग्य अधिकारी व टीम, दापोली पोलीस टीम, राहुल मंडलिक, हॉटेल सागर सावली इत्यादी अनेकांचे सहकार्य लाभले. स्पर्धेचे नियोजन अंबरीश गुरव, प्रशांत पालवणकर, अजय मोरे, राजेशकुमार कदम, रागिणी रिसबूड, राजेंद्र नाचरे, किरण भुवड इत्यादी अनेकांनी केले. दरम्यान, येत्या १७ नोव्हेंबर रोजी शॉर्ट सिटी लूप राइड आणि फॅन राइड असेल, त्यामध्ये सर्वांनी सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन दापोली सायकलिंग क्लबतर्फे करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

