दापोली : दहावी दापोली विंटर सायक्लोथॉन उत्साहात पार पडली.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी, दि. १५ नोव्हेंबरला दापोली विंटर सायक्लोथॉन आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सातारा इत्यादी शहरातील आणि राज्यातील इतर भागातील १० ते ७५ वयोगटातील १४० स्पर्धक सहभागी झाले होते. रत्नागिरीतील ७५ वर्षीय ज्येष्ठ रायडर गजानन भाताडे, अनेक सायकल मोहिमा केलेल्या कल्याणी तुळपुळे (पुणे), सुनील रिसबूड (दापोली) यांनी सायक्लोथॉनला झेंडा दाखवून शुभारंभ केला.
ही सायक्लोथॉन ५० किमी व ३० किमी कोस्टल सिनिक रूट अशा गटात झाली. राइड पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. दापोली, बुरोंडी, करजगाव, लाडघर, कर्दे, मुरूड, सालदुरे, पाळंदे, हर्णै, आसूद या समुद्रकिनाऱ्यांवरील मार्गावर कोकणातील निसर्गसौंदर्य अनुभवत सर्वांनी सायकल चालवली. मार्गावर असलेल्या अनेक पर्यटन ठिकाणांना भेटी दिल्या, कोकणी खाद्यपदार्थ, मासे इत्यादींचा आस्वाद घेतला. स्थानिक उत्पादनांची खरेदी केली. या सायक्लोथॉनमध्ये सहभागी झालेले काही स्पर्धक आपल्या कुटुंबासह २ ते ७ दिवसांसाठी दापोलीत मुक्कामाला आले होते.
या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईहून जितेंद्र यादव, अनिल वेल्लमपती, अतुल ओझा हे मुंबई ते दापोली सायकल चालवत आले होते. विद्याधर पालकर पुणे ते दापोली सायकल चालवत आले होते. गजानन भाताडे (वय ७५), अतुल ओझा-मुंबई (वय ६४), शरद कुलकर्णी-दौंड, अनिल धामणे-पुणे, विठोबा चव्हाण-मुंबई, नितीन बर्वे, सुनील खरात इत्यादी ५८-६० वयोगटातील सायकलस्वारांनी ही सायक्लोथॉन यशस्वीपणे पूर्ण केली, डॉ अनिल शिंदे-वाई यांनी सिंगल गिअर सायकलने ही राइड पूर्ण केली. मेघराज कळमकर (वय १०), अद्वैत जोशी, ग्रीष्मा चव्हाण, रिद्धिमा चव्हाण, शल्व हेदूकर, सम्यक जैन, श्रीराम शिंदे, स्वराज राजपूरकर, आयुष शिंदे, वरद कदम हे सायक्लोथॉन पूर्ण करणारे छोटे सायकलस्वार ठरले.
सायक्लोथॉनसाठी दापोली शिक्षण संस्था, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज टीम, दापोली तालुका आरोग्य अधिकारी व टीम, दापोली पोलीस टीम, मेनेकी न्यूट्रिशन टीम, राहुल मंडलिक इत्यादी अनेकांचे सहकार्य लाभले. या सायक्लोथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यात अंबरीश गुरव, प्रशांत पालवणकर, राजेशकुमार कदम, राजेंद्र नाचरे, सुनील रिसबूड इत्यादी अनेकांनी मोलाची भूमिका बजावली.



