रत्नागिरी : रत्नागिरीत प्रथमच क्षेत्रीय वैदिक संमेलन होणार असून १०० वैदिक पंडितांच्या उपस्थितीत वेदमंत्रांचा जागर होणार आहे.
महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान (उज्जैन) आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक) यांचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच क्षेत्रीय वैदिक संमेलनाचे आयोजन ७ ते ९ फेब्रुवारी या काळात होणार आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या ४ राज्यांतून प्रमुख मंदिरांचे पुजारी आणि विविध वेदपाठशाळांमधील अध्यापक, वेदातील क्रमांत, घनांत अध्ययन पूर्ण केलेले वैदिक मान्यवर संमेलनाला येणार आहेत. या ३ दिवसांच्या संमेलनात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४ वेदांच्या विशिष्ट शाखांचे सामूहिक पठण होणार आहे.
हे संमेलन रत्नागिरीत झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनात होणार असून संमेलनात वेद, वेदविज्ञान यासंबंधी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. वेदांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, वेदांचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचावे, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे संमेलनाला वेदप्रेमी नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातर्फे करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media
