रत्नागिरी : रत्नागिरीत ७ ते ९ फेब्रुवारी २०२५ या काळात होणाऱ्या पहिल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. ७ फेब्रुवारी) भव्य शोभायात्रेने होणार आहे.
महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान, उज्जैन आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे वैदिक संमेलन होणार आहे
शोभायात्रेला ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत माधवराव मुळ्ये भवन येथून सुरुवात होणार आहे. शोभायात्रा म्हणजे वैदिक संस्कृती, परंपरा, आणि तत्त्वज्ञानाच्या प्रसाराचे एक प्रभावी माध्यम ठरणार आहे. यात्रेतील विविध धार्मिक प्रतीके, मंत्रोच्चारण आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती लोकांच्या मनामध्ये धार्मिक एकता आणि सद्भावना जागवतील. तसेच हे कार्यक्रम स्थानिक समुदायातील एकजूट, सामूहिक भावना वाढवण्यास मदत करणार आहेत.
स्थानिक संस्कृती आणि परंपरांचा प्रचार करणे, धार्मिक एकता आणि सामूहिक भावना वाढवणे, समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांना एकत्र आणणे हा या शोभायात्रेचा मुख्य उद्देश आहे. रत्नागिरीतील सर्व नागरिकांनी या क्षेत्रीय वैदिक संमेलनाच्या शोभायात्रेत सहभागी व्हावे,असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या ४ राज्यांतून प्रमुख मंदिरांचे पुजारी आणि विविध वेदपाठशाळांमधील अध्यापक, वेदातील क्रमांत, घनांत अध्ययन पूर्ण केलेले वैदिक मान्यवर संमेलनाला येणार आहेत. या ३ दिवसांच्या संमेलनात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४ वेदांच्या विशिष्ट शाखांचे सामूहिक पठण होणार आहे. तसेच वेद, वेदविज्ञान यासंबंधी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. वेदांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, वेदांचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचावे, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे संमेलनाला वेदप्रेमी नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातर्फे करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

