रत्नागिरी : कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या येथील भारतरत्न डॉ. पांडुरंग काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्रात येत्या ७ ते ९ फेब्रुवारी या काळात होणार असलेल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनात चारही वेदांचे पठण होणार आहे.
उज्जैन येथील महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान या केंद्रीय शिक्षण मंत्रालयांतर्गत स्वायत्त संस्थेतर्फे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने गौरवशाली वैदिक परंपरेचा वारसा घराघरात पोहोचवण्यासाठी रत्नागिरीत क्षेत्रीय वैदिक संमेलन आयोजित केले आहे. रत्नागिरीत झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनात ते ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. ही माहिती संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी दिली.
शुक्रवारी, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रेत १०० वैदिक मान्यवर सहभागी होणार आहेत. स्थानिक रत्नागिरीकरांचादेखील यात सहभाग असेल. ही शोभायात्रा माधवराव मुळ्ये भवन येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाईल आणि पुन्हा माधवराव मुळ्ये भवनात पोहोचेल. यानंतर संमेलनाचे उद्घाटन संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते होईल. गणपतीपुळे संस्थानचे विश्वस्त हरिभाऊ रानडे, विवेक भिडे, स्वामी स्वरूपानंद संस्थानचे कार्याध्यक्ष जयंत देसाई, ज्येष्ठ वेद अभ्यासक डॉ. गणेश थिटे आणि विद्वान डॉ. अंबरीश खरे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
विशेष महत्त्वाचे म्हणजे माधवराव मुळ्ये भवनातील मुख्य सभागृह, योग कक्ष, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे राणी लक्ष्मीबाई सभागृह, गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा आणि श्री वेद पाठशाळा या ५ ठिकाणी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या चारही वेदांमधील विशिष्ट शाखांचे सामूहिक पारायण ७ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० ते ४.३० आणि ८ व ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ व दुपारी २.३० ते ४.३० होणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता नवोदित गायक श्रीधर पाटणकर यांचा गायनसंध्या हा कार्यक्रम पार पडणार आहे. दुसऱ्या दिवशी ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता उपकेंद्राच्या नाट्यशास्त्र विभागाची प्रस्तुती असणार आहे. या वैदिक परंपरेची अनुभूती घेण्यासाठी सर्व वेदप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक डॉ. मराठे यांनी केले आहे.




कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

