रत्नागिरी : भविष्यात केवळ पदवी उपयोगी पडणार नसून, कौशल्य हेच खरे भविष्य ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या तंत्रज्ञानाच्या या युगात युवकांनी आपल्या कौशल्यांमध्ये सातत्याने वृद्धी करणे अत्यंत गरजेचे आहे,' असे प्रतिपादन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तसेच गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते उपस्थित तरुण आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी एका छोट्या गावातल्या सामान्य कुटुंबातून जिल्हाधिकारी पदापर्यंतचा स्वतःचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. 'सुरुवातीला हिंदी माध्यमातून शिक्षण झाल्यानंतर इंग्रजीत जुळवून घेताना अपयश आले; मात्र चिकाटी, सातत्य आणि शिस्तीच्या जोरावर नवीन कौशल्ये शिकत मी पुढे गेलो,' असे सांगून त्यांनी 'द अॅटोमिक हॅबिट्स' या पुस्तकाचा संदर्भ दिला आणि दररोज केवळ एक टक्का प्रगती करत राहिलो, तरी चक्रवाढ पद्धतीने मोठे यश संपादन करता येते, हे स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले, 'आज विविध कंपन्यांमध्ये तंत्रज्ञ किंवा इतर पदांवर नोकरीची सुरुवात करताना केवळ वेतनावर समाधानी न राहता कामातील बारकावे आणि तंत्रज्ञान शिका.' डेल कंपनीचे उदाहरण देऊन ते म्हणाले, 'मायकेल डेल यांनी तंत्रज्ञ म्हणून सुरुवात केली आणि आज शेकडो अब्ज डॉलर्सची कंपनी उभी केली. प्रत्येकाने स्वतःमधली क्षमता ओळखून भविष्यात उद्योग सुरू करण्याचा विचार केला पाहिजे. नोकरी करता करता दिवसातला किमान एक तास स्वतःचे कौशल्य वाढवण्यासाठी द्यावा. तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी भांडवलाची अडचण येऊ नये, म्हणून शासनाच्या सीएमईजीपी, पीएमईजीपी यांसारख्या अनेक योजना उपलब्ध आहेत. युवकांनी ऑनलाइन माध्यमांचा सकारात्मक वापर करून नवीन ज्ञान आत्मसात करावे आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे भविष्य उज्ज्वल करावे.'
'महाविद्यालयीन शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्याचे साधन नसून, विद्यार्थ्यांना सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि रोजगारक्षम बनवण्याचे प्रभावी माध्यम आहे. केवळ नोकरी शोधणारे न राहता तरुणांनी उद्योगजगताकडे वळून नोकऱ्या देणारे व्हावे,' असे मार्गदर्शन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या सेवा, विकास आणि युवा सक्षमीकरण या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत घडवण्यासाठी तरुणांमधील कल्पकता, कौशल्य आणि उद्योजक वृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे,' असे ते म्हणाले. या मेळाव्यात सुमारे २३ नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची आणि स्वतःमधील क्षमता सादर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांनी स्टार्टअप्स, नवनिर्मिती आणि स्वयंरोजगार या संकल्पना समजून घेऊन स्वतःच्या उन्नतीसोबतच समाज व राष्ट्राच्या विकासात योगदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त दत्ता चव्हाण यांनी स्वागत, प्रास्ताविक करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या उपस्थित होत्या.

