Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

खासगी डॉक्टर्सनी सेवा सुरूच ठेवण्याचे आदेश; प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधविक्रीस बंदी

Photo by Pixabay on Pexels.com

Advertisements

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशभरात लॉकडाउन आहे; मात्र या कालावधीत खासगी डॉक्टर्सनी आपले दवाखाने, रुग्णालये, नर्सिंग होम सुरू ठेवून नेहमीप्रमाणे रुग्णांची तपासणी सुरू ठेवावी, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच, प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधविक्रीस बंदी करण्यात आली आहे.

२१ दिवसांच्या लॉकडाउनच्या काळातखासगी डॉक्टर्सनी आपले दवाखाने, रुग्णालये, नर्सिंग होम सुरू ठेवावीत. बाह्य रुग्ण विभाग बंद करू नयेत आणि तातडीच्या आरोग्य सेवा सुरू ठेवाव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रकात म्हटले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची वाहतूक आणि अन्य सूचना पत्रकात देण्यात आल्या आहेत. (पत्रक शेवटी दिले आहे.)

टीव्ही अथवा समाज माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्यांच्या अनुषंगाने काही लोक भीतीपोटी व गरज नसताना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही औषधांची (उदा. Azithromycin, Hydroxychloroquine, Antiretroviral (Antiviral), Antibiotic) यांची खरेदी करीत असल्याची वृत्ते येत आहेत. तसेच अनावश्यक औषधांच्या खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी होत असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री केल्यास आवश्यक औषधांची टंचाई निर्माण होऊन ती गरजूंना वेळेत न मिळण्याचा धोका होऊ शकतो. त्यामुळे केमिस्ट व्यावसायिकांनीदक्ष राहून (Registered Medical Practitioner) डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणत्याही परिस्थितीत वरील आणि Schedule H and H1, Schedule X या वर्गातील औषधांची किरकोळ विक्री करू नये, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये औषधांचा तुटवडा होणार नाही या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, जेणेकरून औषधांचा तुटवडा भासणार नाही व कृत्रिम साठेबाजी होणार नाही, असे सूचित करण्यात आले आहे.

ग्राहक संरक्षक विभाग, नवी दिल्ली याच्या दिनांक २१ मार्च २०२०च्या अधिसूचनेनुसार,

मास्कची (3 ply surgical mask) किरकोळ विक्री किंमत १३ फेब्रुवारी २०२० पूर्वी जी अस्तित्वात होती किंवा १० रुपये प्रति नग यापैकी जी कमी असेल ती

मास्कची (2 ply surgical mask) किरकोळ विक्री किंमत ही १३ फेब्रुवारी २०२० पूर्वी जी अस्तित्वात होती किंवा आठ रुपये प्रति नग यांपैकी जी कमी असेल ती

हँड सॅनिटायझरची किरकोळ विक्री किंमत जास्तीत जास्त १०० रुपये प्रति नग (२०० मिली बाटली) आणि इतर प्रमाणाबाबत वरीलप्रमाणे समप्रमाणात निश्चित करण्यात आली आहे.

या किमती २१ मार्च २०२० ते ३० जून २०२०पर्यंत लागू राहणार आहेत.

या गोष्टींचे उल्लघंन झाल्याचे आढळल्यास औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्याअंतर्गत नियम १९४५ आणि अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५, तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version