खासगी डॉक्टर्सनी सेवा सुरूच ठेवण्याचे आदेश; प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधविक्रीस बंदी

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशभरात लॉकडाउन आहे; मात्र या कालावधीत खासगी डॉक्टर्सनी आपले दवाखाने, रुग्णालये, नर्सिंग होम सुरू ठेवून नेहमीप्रमाणे रुग्णांची तपासणी सुरू ठेवावी, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच, प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधविक्रीस बंदी करण्यात आली आहे.

२१ दिवसांच्या लॉकडाउनच्या काळातखासगी डॉक्टर्सनी आपले दवाखाने, रुग्णालये, नर्सिंग होम सुरू ठेवावीत. बाह्य रुग्ण विभाग बंद करू नयेत आणि तातडीच्या आरोग्य सेवा सुरू ठेवाव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रकात म्हटले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची वाहतूक आणि अन्य सूचना पत्रकात देण्यात आल्या आहेत. (पत्रक शेवटी दिले आहे.)

टीव्ही अथवा समाज माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्यांच्या अनुषंगाने काही लोक भीतीपोटी व गरज नसताना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही औषधांची (उदा. Azithromycin, Hydroxychloroquine, Antiretroviral (Antiviral), Antibiotic) यांची खरेदी करीत असल्याची वृत्ते येत आहेत. तसेच अनावश्यक औषधांच्या खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी होत असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री केल्यास आवश्यक औषधांची टंचाई निर्माण होऊन ती गरजूंना वेळेत न मिळण्याचा धोका होऊ शकतो. त्यामुळे केमिस्ट व्यावसायिकांनीदक्ष राहून (Registered Medical Practitioner) डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणत्याही परिस्थितीत वरील आणि Schedule H and H1, Schedule X या वर्गातील औषधांची किरकोळ विक्री करू नये, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये औषधांचा तुटवडा होणार नाही या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, जेणेकरून औषधांचा तुटवडा भासणार नाही व कृत्रिम साठेबाजी होणार नाही, असे सूचित करण्यात आले आहे.

ग्राहक संरक्षक विभाग, नवी दिल्ली याच्या दिनांक २१ मार्च २०२०च्या अधिसूचनेनुसार,

मास्कची (3 ply surgical mask) किरकोळ विक्री किंमत १३ फेब्रुवारी २०२० पूर्वी जी अस्तित्वात होती किंवा १० रुपये प्रति नग यापैकी जी कमी असेल ती

मास्कची (2 ply surgical mask) किरकोळ विक्री किंमत ही १३ फेब्रुवारी २०२० पूर्वी जी अस्तित्वात होती किंवा आठ रुपये प्रति नग यांपैकी जी कमी असेल ती

हँड सॅनिटायझरची किरकोळ विक्री किंमत जास्तीत जास्त १०० रुपये प्रति नग (२०० मिली बाटली) आणि इतर प्रमाणाबाबत वरीलप्रमाणे समप्रमाणात निश्चित करण्यात आली आहे.

या किमती २१ मार्च २०२० ते ३० जून २०२०पर्यंत लागू राहणार आहेत.

या गोष्टींचे उल्लघंन झाल्याचे आढळल्यास औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्याअंतर्गत नियम १९४५ आणि अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५, तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

  1. आजकाल अशी *अफवा पसरवली जात आहे की डॉक्टरांनी घाबरून दवाखाने बंद केले* आहे.
    खरतर *या कठीण काळात काम करणाऱ्या डॉक्टरांवर अतिशय खोटं व गंभीर आरोप करून स्वतःला नायक व डॉक्टरांना खलनायक ठरवू पाहणाऱ्या काही वृत्तींचे हे काम* आहे.

    डॉक्टरांनी *दवाखाने का बंद* ठेवले याचे *शास्त्र शुद्ध कारण* सांगणारा हा लेख प्रपंच.

    खरेतर मी लेखक नसल्याने लिखाणात काही चुका होऊ शकतात तर सर्वप्रथम क्षमा.
    1 आपल्याला माहीत असेल की आपल्याला कळायला लागले तेव्हापसून ही काही पहिलीच साथ नाही. *या तसेच यापूर्वीच्या प्रत्येक साथिमध्ये डॉक्टरांनी रुग्णसेवा प्राधान्य देवून अहोरात्र मेहनत घेऊन सेवा दिली आहे.*
    तसेच प्रत्येक साथी दरम्यान आपल्या क्षमतेपेक्षा अधिक काम केले आहे.
    2 यापूर्वी आलेल्या *स्वाइन फ्ल्यू सारख्या गंभीर आजारात सुद्धा डॉक्टरांनी संपूर्ण सेवा दिल्या* आहेत.
    3 परंतु ही साथ इतर आजारापेक्षा वेगळी आहे. या साथीच्या आजारांमध्ये *आदरणीय पंतप्रधान पासून तर सर्व तज्ञ लोकांचे एकच सांगणे आहे ते म्हणजे गर्दी टाळा, एकमेकांसोबत संपर्क टाळा.*
    4 ही माझ्या माहितीतील पहिली साथ आहे की *आंतरराष्ट्रिय सीमेपासून तर जिल्ह्याच्या सीमा बंद* करण्यात येत आहे.
    5 अश्या परिस्थितीत डॉक्टरांचे *दवाखाने हे रुग्णांच्या संपर्काचे सर्वात मोठे स्थान* आहे.
    या ठिकाणी येणारे व्यक्ती हे वेगवगळ्या आजारांशी संबंधित असून त्यांचे *व्याधिक्षमत्व मुळातच कमी* झालेले असते. या व्यक्तींना दवाखान्यात आणल्यानंतर त्यांना *आजूबाजूला असणाऱ्या रुग्णांना असलेल्या आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता* जास्त असते.
    6 जर एखादा *करोणा आजाराने ग्रस्त व्यक्ती* दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आला तर *त्याच्या संपर्कातून वेटींग रुममध्ये असणाऱ्या रुग्णांना संपर्कातून संसर्गाची शक्यता* नाकारता येणार नाही.
    तसेच प्रत्येक रुग्ण दवाखान्यात आल्यावर त्याचा संपर्क होणारे *रुग्णालयातील वेटींग रुम, रुग्णांना बसण्यासाठी असलेले बेंच, रुग्ण तपासणीचा टेबल, तसेच इतर साहित्य पूर्णपणे निर्जंतुक करणे शक्य होणार नाही.*

    अश्या परिस्थितीत एखाद्या करोणा संशयित/ करोणाग्रस्त रुग्ण दवाखान्यात येवून गेल्यावर त्याच्यापासून इतरांना आजार होण्याचे मोठे केंद्र दवाखाना होवू शकते. *भिलवडा राजस्थान येथील घटना याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.*

    7 *डॉक्टर स्वतः स्वतःचे व आपल्या कर्मचाऱ्याचे या आजारापासून सुरक्षा योजना करण्यासाठी प्रशिक्षित* असून सोबतच काही प्रतिबंधक साधनांचा वापर करून आजाराच्या संसर्गापासून रक्षण करू शकतात. *परंतु रुग्णांना तसेच त्यांच्या सोबत असणाऱ्या नातेवाईक यासाठी पूर्णपणे प्रशिक्षित नसतात.*

    8 या सर्व बाबी विचारात घेऊन *आदरणीय पंतप्रधान यांनी रुग्णांना अत्यावश्यक नसणाऱ्या रुग्णालय भेटी तसेच निवडक अत्यावश्यक नसणाऱ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात याव्या असे आवाहन* केले आहे.

    यासर्व *संसर्गा वर प्रतिबंध म्हणून रुग्णांना काही दिवस फोन वरून सल्ला देण्याविषयी* डॉक्टरांचे नोंदणी करणाऱ्या शिर्षस्थ संस्थांनी (ज्याला इतर वेळी सुप्रीम कोर्टाने प्रतिबंध केला आहे) तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं डॉक्टर आपल्या रुग्णांना फोनद्वारे सल्ला देत आहेत.
    आणि *अत्यावश्यक असलेल्या रुग्नानांच दवाखान्यात येऊन उपचार* करण्याचा सल्ला देत आहे.
    असे करून *डॉक्टर आपले आर्थिक नुकसान सोसून आपली सेवा देतच आहे.*

    या सर्व बाबी विचारात घेता *डॉक्टर घेत असलेली काळजी रास्त असून त्यांच्या निर्णयचा आदर केला पाहिजे* असे मला वाटते.
    तरी आपण अनावश्यक तसेच अती आवश्यक नसणाऱ्या कारणासाठी दवाखान्यात जाणे टाळले पाहिजे व *डॉक्टरांचा अपप्रचार टाळावा* ही विनंती.

Leave a Reply