आठ मार्चनंतर पुण्या-मुंबईतून रत्नागिरीत आलेल्यांनी सक्तीने घरीच राहावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रत्नागिरी : मुंबई व पुणे शहरातून आठ मार्च २०२०नंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेल्या व्यक्तींनी राहत्या ठिकाणातून/घरातून बाहेर पडू नये, असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा (१९८७) १३ मार्च २०२०पासून लागू केला आहे. तसेच, खंड २, ३, ४मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. देशाच्या, राज्याच्या विविध भागांत आणि रत्नागिरी जिल्ह्यातही करोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. करोना विषाणूचा संसर्ग विषाणूबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यास होतो. त्यामुळे करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांपासून व त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींपासून दुसऱ्या व्यक्तींना या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी हे सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी केली जात आहे.

मुंबई व पुणे या शहरांत करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यापासून अन्य व्यक्तींना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक मुंबई व पुणे शहरातून रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यास स्थानिक नागरिकांना करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबई व पुणे शहरातून आठ मार्च २०२०नंतर रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींना राहत्या ठिकाणातून/घरातून बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा रत्नागिरीच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ४३ व कलम ५६ आणि भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ आणि महाराष्ट्र कोव्हिड-१९ उपाययोजना नियम २०२० या अंतर्गत दंडनीय कारवाई करण्यात येईल, असे कळवण्यात आले आहे.

या कार्यालयाने यापूर्वीवेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारित आदेश, निर्देश, परिपत्रके या आदेशासह अंमलात राहतील, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply