साठेबाजी, काळ्या बाजाराला प्रतिबंध; जीवनावश्यक वस्तूंच्या सहज उपलब्धतेकरिता व्यापाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

त्नागिरी : सध्या राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि संचारबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तू व सेवा उपलब्ध करून देताना व्यापाऱ्यांकडून साठेबाजी, तसेच काळा बाजार झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यांच्यासाठी काही सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊन गर्दी करू नये, जीवनावश्यक वस्तू सुरळीतपणे उपलब्ध होणार आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा (१९८७) १३ मार्च २०२०पासून लागू केला आहे. तसेच, खंड २, ३, ४मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. करोनाच्या विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४ लागू करण्यात आले असून, त्यानुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

संचारबंदीच्या कालावधीत किराणा माल विक्रेते आणि केमिस्टकडून नागरिकांना जीवनावश्यक सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना खालील सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

 • किराण माल विक्रेते, केमिस्ट यांनी आपले दुकान संचारबंदी कालावधीत सुरू ठेवावे.
 • शक्यतो ही दुकाने 24X7 सुरू ठेवावीत.
 • ग्राहकांना घरपोच सेवा देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी.
 • दुकानातील माल एमआरपीपेक्षा जास्त दराने विकता कामा नये अथवा वाजवी बाजारभावापेक्षा जास्त दराने विक्री करू नये. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 • दुकानात सर्व प्रकारच्या वस्तूंचा आवश्यक तो साठा असणे आवश्यक आहे. तो संपल्यास त्याची उपलब्धता संबंधित पुरवठादारांकडून त्वरित करून घेण्यात यावी.
 • अत्यावश्यक सेवेच्या वस्तूंची साठेबाजी करण्यात येऊ नये. त्याचा साठा अनुज्ञेय असलेल्या प्रमाणातच असणे आवश्यक आहे.
 • किराणा माल विक्रेत्यांनी कडधान्य व तृणधान्यांसंदर्भात स्वत:कडे साठा नोंदवही (Stock Register) ठेवावी.
 • दोन ग्राहकांमध्ये किमान तीन फूट अंतर राहील या पद्धतीने ग्राहकांना दुकानात व दुकानासमोर उभे राहण्यासंदर्भात व्यवस्था करण्यात यावी.
 • दुकानदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मास्कचा वापर करावा. तसेच दुकान व परिसरात वेळोवेळी सॅनिटायझेशन करावे.
 • दुकानाच्या बाहेर दर्शनी भागात आपल्याकडे वस्तूंचा आवश्यक साठा उपलब्ध असल्याबाबत व त्याची विक्री एमआरपीपेक्षा जास्त दरात करत नसल्याबाबतचा सूचना फलक लावण्यात यावा.
 • दुकानदाराचे नाव, दुकानात अत्यावश्यक वस्तूंचा साठा आवश्यकतेनुसार उपलब्ध आहे, दुकानातील सर्व वस्तू MRPमध्येच विक्रीस उपलब्ध आहेत. काही तक्रार असेल तर जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथील मदत केंद्रात (दूरध्वनी क्रमांक ०२३५२ – २२२२३३, व्हॉट्सअॅप नं. ७०५७२ २२२३३) संपर्क साधावा, या बाबी सूचनाफलकावर नमूद कराव्यात.

या सूचनांचे पालन काटेकोरपणे करण्यात आले नाही, तर संबंधितांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५चे कलम तीन व सातअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कळविले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply