का झाला 'आकाशवाणी रत्नागिरी'च्या कार्यक्रमांमध्ये बदल?

रत्नागिरी : आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून २४ मार्च २०२० रोजी नेहमीचे कार्यक्रम प्रसारित झाले नाहीत. करोना आजाराच्या प्रतिबंधासाठी गर्दी टाळण्याकरिता शक्य असेल तेथे शासकीय आणि खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा आणण्यात आली आहे. त्यामुळे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रातही मोजकेच कर्मचारी होते आणि स्थानिक कार्यक्रमांचे प्रसारण नेहमीप्रमाणे होऊ शकले नाही. त्यामुळे आकाशवाणीच्या नियमित श्रोत्यांना नेहमीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेता आला नाही. हीच स्थिती आणखी काही दिवस राहणार आहे.

शासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची संख्या सुरुवातीला पन्नास टक्के, त्यानंतर २५ टक्क्यांवर आणि त्यानंतर पाच टक्क्यांवर आणण्यात आली. केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये तर ही संख्या अडीच टक्के इतकी खाली आणण्यात आली आहे. त्यामुळे आकाशवाणीच्या केंद्रांमध्ये अत्यंत मोजके कर्मचारी उपस्थित आहेत. देशभरामध्ये ही स्थिती असल्याने रत्नागिरी केंद्रालाही कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम करावे लागत आहे. देशभरातील स्थिती लक्षात घेऊन आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरील नियमित कार्यक्रमांमध्ये कपात करण्यात आली. त्याची अंमलबजावणी आजपासून (२४ मार्च) झाली. परिणामी स्थानिक केंद्रांना स्वतःचे कोणतेही कार्यक्रम प्रसारित करता येऊ शकले नाहीत. पुढील सूचना मिळेपर्यंत यामध्ये बदल होणार नाही.

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही बातमीपत्रांतही कपात करण्यात आली आहे. त्यामुळे दुपारी तीन आणि सायंकाळी सात वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. पुण्याचे प्रादेशिक बातमीपत्र नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजून १० मिनिटांनी प्रसारित होईल.

मात्र रोज सकाळी साडेआठ, दुपारी दीड आणि रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी राष्ट्रीय बातम्या प्रसारित होतात. त्याशिवाय दुपारी एक वाजून ४० मिनिटांनी जिल्हा वार्तापत्र प्रसिद्ध केले जाते. पुढील सूचना मिळेपर्यंत यापैकी कोणतीही बातमीपत्रे प्रसारित होणार नाहीत, असे आकाशवाणीच्या बातमीपत्रातच नमूद करण्यात आले आहे.

‘आकाशवाणीच्या श्रोत्यांची संख्या अलीकडे कमी झाली आहे, आकाशवाणी ऐकतो कोण,’ असे प्रश्न विचारले जात असत; मात्र आज सकाळपासून नियमित कार्यक्रम प्रसारित न झाल्यामुळे, तसेच नियमित कार्यक्रमांच्या वेळी विविध भारती आणि दिल्लीतील काही कार्यक्रम ऐकावे लागल्यामुळे अनेक श्रोत्यांनी आकाशवाणीशी याबाबत संपर्क साधला. आकाशवाणीच्या श्रोत्यांची संख्या कमी झालेली नाही याचे हे निदर्शक आहे, असे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply