रत्नागिरी : करोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी जीवनाश्यक वस्तू मिळणाऱ्या दुकानात गर्दी टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी ग्राहकांना त्या वस्तू घरपोच देण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या आहेत.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्या वेळी ही सूचना करण्यात आली. या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव, रत्नागिरी शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष उदय पेठे, आगाशे डिपार्टमेंटल स्टोअर्सचे अनंत आगाशे, अपना बाजारचे प्रतिनिधी अरुण जाधव, डी-मार्टचे प्रतिनिधी, तसेच दिलीप पटवर्धन, माधव फल्ले, अमृत तांडेल, रोहन गांधी, दिनेश सावंत, अब्दुला हजर दुवावाला आदी व्यापारी उपस्थित होते.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी टाळणे गरजेचे आहे. यासाठी होम डिलिव्हरीवर भर द्यावा. वाहतुकीत काही अडचण असल्यास कळवावे. होम डिलिव्हरी करणाऱ्यांचा, तसेच वाहनाचा क्रमांक दिल्यास होम डिलिव्हरी करताना अडचण होणार नाही. दुकाने सुरू राहण्याची वेळ ठरवून घ्यावी. प्रशासनाकडून त्याबाबत आदेश देण्यात येतील. दुकानांमध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा जीवनाश्यक वस्तूंची दुकानेही बंद करण्याची वेळ येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
ग्राहकांनीही दुकानदारांकडे होम डिलिव्हरीचा आग्रह धरावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : मध्यवर्ती नियंत्रण कक्ष : फोन क्रमांक (०२३५२) २२२२३३, २२६२४८
लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा विनाखंड होणार आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. त्यांच्या आवाहनाचा ऑडिओ सोबत देत आहोत.