नवी सुरुवात; राज्यातील लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल; नियमावली जाहीर

मुंबई : ‘मिशन बिगिन अगेन’ या अभियानांतर्गत राज्य सरकारने लॉकडाउनमधील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात तीन जून, पाच जून आणि आठ जून अशा तीन टप्प्यांत केली जाईल. यामुळे राज्याच्या अर्थचक्राला पुन्हा गती मिळणार आहे. काही निर्बंधासह रिक्षा, स्कूटर या वाहनांना परवानगी देण्यात आली असून, दुकानेसुद्धा निर्धारित केलेल्या नियमानुसार व वेळेत सुरू राहतील. हा आदेश एक जूनपासून अमलात येत असून, तो ३० जून २०२०पर्यंत लागू राहणार असल्याचे शासनाने जाहीर केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

करोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन या कालावधीत केले जाणार असून, त्या आधारे राज्याने आपली नियमावली बनवली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता राज्यात रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी राहील. स्थानिक प्रशासन त्यांच्या अधिकार क्षेत्रासाठी सीआरपीसीच्या कलम १४४अंतर्गत बंदीचे आदेश काढून त्याची कडक अंमलबजावणी करतील. ६५ वर्षावरील व्यक्ती, कोमॉ बिडिज असणाऱ्या व्यक्ती, गरोदर महिला आणि मुलांनी वैद्यकीय व इतर अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडू नये, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन्स)

 • केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधित क्षेत्र नेमके कोणते असेल हे महापालिका किंवा जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत ठरविण्यात येईल. महानगरपालिका क्षेत्रात पालिका आयुक्त, तर जिल्ह्यातील इतर भागासाठी जिल्हाधिकारी यांना प्रतिबंधित क्षेत्र नेमके कोणते असेल हे ठरविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित क्षेत्राची तपासणी वेळोवेळी करणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्रात रहिवासी संकुल आणि वस्ती, झोपडी, इमारत, रस्ता, वॉर्ड, पोलीस ठाणे परिसर, छोटी गावे असू शकतील. पूर्ण तालुका, पूर्ण पालिका क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यापूर्वी मुख्य सचिवांची परवानगी घेणे आवश्यक राहील.
 • कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांच्या ये-जा करण्यावर कडक निर्बंध घालण्यात आले असून, त्यावर बारकाईने देखरेख ठेवण्यात येईल. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार वैद्यकीय आणि जीवनाश्यक वस्तूंना यामधून सूट देण्यात आली आहे.

निर्बंधातून सूट आणि टप्प्याटप्प्याने मोकळीक
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महानगरपालिका क्षेत्रात आधीच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आलेल्या कामांशिवाय इतर कामांनाही काही निर्बंधांसह परवानगी देण्यात येत आहे. तथापि या क्षेत्रातील कंटेनमेंट झोनमध्ये ही कामे करता येणार नाहीत.

मिशन बिगिन अगेन – पहिला टप्पा (तीन जून २०२०पासून)

 • बाह्य हालचाली : सायकलिंग/जॉगिंग/धावणे/चालणे यांसारख्या वैयक्तिक शारीरिक व्यायामासाठी किनारपट्टी, सार्वजनिक/खासगी क्रीडांगणे, सोसायट्या/संस्थांची क्रीडांगणे, उद्याने आणि टेकड्यांवर काही अटी व शर्तींवर सर्वसामान्य नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे; मात्र बंद भागामध्ये (इनडोअर) अथवा इनडोअर स्टेडियममध्ये कोणत्याही कामांना परवानगी देण्यात आलेली नाही.
 • ही परवानगी ही सकाळी पाच ते संध्याकाळी सातपर्यंत असेल.
 • कोणत्याही सामूहिक कामास (ग्रुप अॅक्टिव्हिटी) अथवा क्रियेस परवानगी दिली जाणार नाही. मुले असल्यास त्यांच्याबरोबर प्रौढ व्यक्तीदेखील असाव्यात.
 • शारीरिक व्यायामासाठी घराबाहेर पडायचे असल्यास लोकांनी मर्यादित कालावधीतच बाहेर पडावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
 • इतर कोणत्याही कामांना अथवा उपक्रमांना परवानगी नाही.
 • लोकांना फक्त जवळपासच्या मोकळ्या जागांचा वापर करण्याची परवानगी आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासास परवानगी दिली जाणार नाही.
 • लोकांनी गर्दी असलेल्या मोकळ्या जागांना टाळावे, असा सल्ला देण्यात येत आहे.
 • सायकलिंगसारख्या शारीरिक व्यायामावर जास्त भर द्यावा, जेणेकरून सामाजिक अंतर ठेवण्यास आपोआप मदत होईल.
 • प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कीटक नियंत्रक (पेस्ट कंट्रोल) व तंत्रज्ञ यासारख्या स्वयंरोजगार करणाऱ्यांनी योग्य सामाजिक अंतर पाळून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून कामे करावीत.
 • पूर्वपरवानगी घेऊन/ वेळ ठरवून घेऊन वाहनांची दुरुस्ती व वर्कशॉप सुरू करता येतील.
 • सर्व शासकीय कार्यालये (आणीबाणी, आरोग्य व वैद्यकीय, तिजोरी, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न व नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, नगरपालिका सेवा वगळता जी शेवटच्या पातळीपर्यंत गरजेनुसार कामे करू शकतात) ही १५ टक्के कर्मचारी अथवा कमीत कमी १५ कर्मचारी यांपैकी जी जास्त संख्या असेल त्या संख्येच्या मनुष्यबळांसह सुरू करण्यात येतील.

मिशन बिगिन अगेन – टप्पा दोन (पाच जून २०२०पासून)

 • सर्व मार्केटस्, मार्केट क्षेत्र आणि दुकाने (मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सशिवाय) पी – वन, पी – टू तत्त्वावर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील. (रस्ता, गल्ली किंवा एखाद्या क्षेत्रातील एका बाजूची दुकाने विषम तारखेला तर दुसऱ्या बाजूची दुकाने सम तारखेला खुली राहतील.)
 • करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने, कपड्यांच्या किंवा तत्सम दुकानांमध्ये ट्रायल रूमचा वापर करता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) राहील याची दुकानदारांनी खबरदारी घ्यायची आहे. ग्राहकांना उभे राहण्यासाठी जमिनीवर चिन्ह तयार करणे, टोकन पद्धती, होम डिलिव्हरी आदींना प्रोत्साहन द्यावे.
 • खरेदीसाठी लोकांनी पायी जावे किंवा सायकलचा वापर करावा. शक्यतो जवळची दुकाने किंवा मार्केटमध्ये खरेदी करावी. अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी लांबच्या प्रवासाला अनुमती नाही. खरेदीसाठी वाहनांचा वापर करण्यात येऊ नये.
 • सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित दुकान, मार्केट प्रशासनाकडून बंद करण्यात येईल.
 • टॅक्सी, कॅब, ॲग्रिगेटर यांना अत्यावश्यक सेवेकरिता चालक अधिक दोन प्रवासी, रिक्षासाठी अत्यावश्यक सेवेकरिता चालक अधिक दोन प्रवासी, चारचाकी वाहनांसाठी अत्यावश्यक सेवेकरिता चालक अधिक दोन प्रवासी, तर मोटारसायकलसाठी अत्यावश्यक सेवेकरिता एक प्रवासी याप्रमाणे अनुमती असेल.

  मिशन बिगिन अगेन – टप्पा क्रमांक तीन (आठ जूनपासून सुरू होईल)
 • सर्व खासगी कार्यालये १० टक्के मनुष्यबळासह सुरू करता येतील. इतर कर्मचारी घरी राहून काम करतील. कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझेशन, सामाजिक अंतर यांचे नियम पाळावे लागतील. घरी परतल्यानंतर घरातील वयस्कर व्यक्तींना कोणताही संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. या अनुषंगाने संबंधित आस्थापनांनी योग्य त्या सूचना/निर्देश सर्व कर्मचाऱ्यांना द्यावेत.
 • जी कामे करण्यासाठी बंदी नाही, ती सुरू ठेवता येतील. परवानगी असलेल्या कामांसाठी कोणत्याही शासकीय परवानगीची गरज असणार नाही. स्टेडियम आणि खुली क्रीडा संकुले ही व्यक्तिगत कवायती, व्यायामासाठी वापरात येतील; मात्र या ठिकाणी प्रेक्षक वा दर्शकांच्या सहभागावर पूर्णपणे बंदी राहील. इनडोअर स्टेडियममध्ये कोणत्याही बाबीस परवानगी दिली जाणार नाही. सर्व शारीरिक कवायती आणि व्यायाम सामाजिक अंतराचे नियम पाळून करणे आवश्यक राहील.
 • सर्व खासगी आणि सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन पुढीलप्रमाणे राहील – दुचाकी एक प्रवासी, तीन चाकी किंवा ऑटो रिक्षा – चालक अधिक दोन प्रवासी, चारचाकी वाहने – चालक अधिक दोन प्रवासी.
 • जिल्ह्यांतर्गत बस वाहतुकीला जास्तीत जास्त ५० टक्के क्षमतेसह अनुमती असेल. तसेच यामध्ये दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, तसेच स्वच्छताविषयक काळजी घ्यावी लागेल.
 • आंतरजिल्हा (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात) बस वाहतुकीला अनुमती नसेल. या संदर्भातील आदेश स्वतंत्ररीत्या निर्गमित करण्यात येतील.
 • सर्व दुकाने, मार्केट्स सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत खुली राहतील. गर्दी दिसल्यास किंवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास प्रशासनाकडून ही दुकाने किंवा मार्केट तातडीने बंद करण्यात येतील.

पुढील बाबींना राज्यभर प्रतिबंध :

 • शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था, विविध शिकवणी वर्ग बंद.
 • प्रवाशांच्या आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासास बंदी. (गृह मंत्रालयाच्या परवानगीने जात असलेले प्रवासी सोडून)
 • मेट्रो, रेल्वे सेवा पूर्णपणे बंद.
 • स्वतंत्र आदेश आणि मानक प्रक्रियेद्वारे (एसओपी) परवानगी न घेतल्यास रेल्वे आणि आंतरदेशीय विमान प्रवासास बंदी.
 • सिनेमा हॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, मोठे सभागृह, आणि तत्सम इतर ठिकाणे बंद.
 • सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, तसेच मोठ्या समारंभांना बंदी.
 • सार्वजनिक धार्मिक स्थळे, पूजास्थळे बंद.
 • केशकर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर बंद.
 • शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद.
 • निर्बंध कमी करण्याची प्रक्रिया, तसेच यातील काही बाबी सुरू करण्यास विशिष्ट मानकांद्वारे आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून टप्प्याटप्प्याने परवानगी दिली जाईल.

विशिष्ट प्रकरणात व्यक्ती आणि वस्तूंच्या हालचालींसाठी निर्देश

 • सर्व प्राधिकाऱ्यांनी वैद्यकीय व्यावसायिक, परिचारिका व पॅरामेडिकल कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि रुग्णवाहिकांना कोणत्याही प्रकारच्या निर्बंधाशिवाय राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय हालचाली/वाहतुकीस परवानगी द्यावी.
 • तथापि, लोकांच्या आंतरराज्यीय आणि आंतरजिल्हा हालचालींवर नियंत्रण असेल. अडकलेले मजूर, स्थलांतरित कामगार, प्रवासी भाविक, पर्यटक इत्यादींच्या हालचालींचे नियमन वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या प्रमाणित कार्य मानके/कार्यप्रणालीनुसार (एसओपी) केले जाईल.
 • श्रमिक विशेष रेल्वेगाड्या व सागरी वाहतूकदारांकडून होणाऱ्या वाहतुकीचे नियमन वेळोवेळी जारी केलेल्या ‘एसओपी’नुसार केले जाईल.
 • देशाबाहेर अडकलेल्या भारतीय नागरिकांची त्यांना देशात आणण्यासाठी तसेच विशिष्ट व्यक्तींची परदेशात जाण्यासाठी हालचाल; परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठविणे; भारतीय खलाश्यांचे साइन-ऑन आणि साइन-ऑफ यांचे नियमन वेळोवेळीच्या ‘एसओपी’नुसार केले जाईल.
 • सर्व प्राधिकाऱ्यांनी सर्व प्रकारच्या वस्तू/मालाच्या आंतरराज्यीय वाहतुकीस परवानगी द्यावी. यामध्ये रिकाम्या ट्रकच्या हालचालीचाही समावेश राहील.
 • शेजारील देशांसोबतच्या करारानुसार संबंधित देशांबरोबर होणाऱ्या व्यापारांतर्गत वस्तू/मालवाहतुकीस कोणतेही प्राधिकरण अडथळा आणणार नाही.

आरोग्य सेतू ॲपचा वापर

 • ‘आरोग्य सेतू’ ॲप संक्रमणाच्या संभाव्य जोखमीची लवकर ओळख करण्यास सक्षम आहे. कार्यालये व कामाच्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाइल फोनमध्ये ‘आरोग्य सेतू’ ॲप कार्यान्वित करण्यासाठी सर्व नियोक्त्यांनी विशेष प्रयत्न करावेत, तसेच त्याबाबतची खात्री करावी.
 • जिल्ह्यातील प्राधिकाऱ्यांनी नागरिकांना स्मार्टफोनवर ‘आरोग्य सेतू’ अॅलप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी व त्यावर त्यांची आरोग्य स्थिती नियमितपणे अद्ययावत करण्याचा सल्ला दिला पाहिजे. यामुळे करोना संसर्गाचा धोका असू शकणाऱ्या व्यक्तींना वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे सुलभ जाऊ शकते.

सर्वसाधारण सूचना

 • कंटेनमेंट क्षेत्रात यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्यविषयक प्रोटोकॉलचे (नियमावलीचे) पालन केले जाईल.
 • या मार्गदर्शक सूचनांच्या विरोधात कोणतेही आदेश/मार्गदर्शक सूचना/दिशानिर्देशन कोणत्याही जिल्हा, क्षेत्रीय किंवा राज्य प्राधिकरणास, राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहमतीशिवाय काढता येणार नाहीत.

दंडाची तरतूद
कोणत्याही व्यक्तीने या निर्देशांचे उल्लघन केल्यास, ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५च्या कलम ५१ ते ६० अंतर्गत कारवाईस पात्र राहील. भारतीय दंड संहिता (IPC) कलम १८८ आणि इतर कायदेशीर तरतुदींनुसार कार्यवाही केली जाईल.

(सरकारचा इंग्रजीतील मूळ आदेश वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.)

https://www.facebook.com/rasinfoodsbyag

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s