Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

आशादीप संस्थेचे आकाशकंदील, पणत्या विक्रीसाठी सज्ज

Advertisements

रत्नागिरी : येथील आशादीप मतिमंद मुलांच्या संस्थेने तयार केलेले छोटे आकाशकंदील, पणत्या, उटणे, कागदी फुले असे साहित्य दिवाळीच्या विक्रीसाठी सज्ज झाले आहे. त्यांची खरेदी करून मतिमंद मुलांच्या स्वयंरोजगाराला हातभार लावावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

रत्नागिरीतील आशादीप संस्था मतिमंद मुलांच्या आयुष्यात आशेचे दीप उजळवण्याचे कार्य गेल्या १७ वर्षांपासून करत आहे. मतिमंद मुलांना समाजात योग्य स्थान मिळत नाही. आई-वडील म्हातारे होत जातात. भावंडांना आपापले व्याप असतात. अशा स्थितीत या मुलांचे संगोपन करायचे कोणी, हा प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक आई-वडिलांना आपले मूल प्रियच असते. संस्थेचे संस्थापक दिलीप रेडककर यांचा मुलगा मतिमंद आहे. या मुलाचे काय होणार, या विचाराने ते हवालदिल झाले होते. मात्र त्यांनी या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. आपल्यासारख्याच समदु:खी पालकांचा ग्रुप त्यांनी तयार केला आणि मतिमंद मुलांच्या आयुष्यात आशेचे दीप उजळणारी ‘आशादीप’ ही संस्था रत्नागिरीत उभी राहिली.

संस्थेत सर्व सण अगदी गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. मुलांना घरची आठवण येऊ नये किंवा त्यांच्या सेवेत काही कमी पडू नये, यासाठी संस्थेतील कर्मचारी अविरत प्रयत्न करत असतात. सेवाभावी वृत्तीचे हे कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करतात. मुलांना काही तरी काम मिळावे या उद्देशाने संस्थेने स्वयंरोजगार केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे मुले काम करतात आणि त्याचा मोबदला त्यांच्या नावे बँकेत जमा केला जातो. वर्तमानपत्रांपासून पेपर बॅग, कागदी फुले, हिराचे झाडू, पणत्या, उटणे तयार करणे इत्यादी उपक्रम मुलांमार्फत करून घेतले जातात.

यावर्षीही दिवाळीच्या निमित्ताने मुलांनी अशा वस्तू तयार केल्या असून त्यांची विक्री सुरू आहे. छोटे आकाशकंदील १४० रुपये डझन, पणत्या, उटण्याची दोन पाकिटे आणि फुले असा १०० रुपयांचा संच अशा स्वरूपात या वस्तू आशादीप संस्थेत उपलब्ध आहेत. या वस्तूंची खरेदी करून मुलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन श्री. रेडकर (84593 48953) यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version