रत्नागिरी : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष डॉ. तोरल शिंदे आणि सहकाऱ्यांनी आशादीप या दिव्यांग मुलांच्या वसतिगृहात गाद्या दिल्या.
आशादीप ही संस्था मतिमंद दिव्यांग मुलांचा सांभाळ करते. तेथे राहणाऱ्या मुलांना झोपण्यासाठी गाद्यांची आवश्यकता होती. ती लक्षात घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने २५ गाद्या देण्यात आल्या.
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. तोरल शिंदे, उपाध्यक्ष डॉ. अतुल ढगे, डॉ. प्रज्ञा पोतदार, डॉ. नीलेश शिंदे उपस्थित होते. यावेळी आशादीप संस्थेचे अध्यक्ष दिलीप रेडकर यांच्यासह पदाधिकारी आणि उपस्थित मुलांनी आपलेपणाने सर्व डॉक्टर्सचे स्वागत केले आणि आभार मानले.

रत्नागिरीतील आशादीप संस्था मतिमंद मुलांच्या आयुष्यात आशेचे दीप उजळवण्याचे कार्य करत आहे. मतिमंद मुलांना समाजात योग्य स्थान मिळत नाही. आई-वडील म्हातारे होत जातात. भावंडांना आपापले व्याप असतात. अशा स्थितीत या मुलांचे संगोपन करायचे कोणी, हा प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक आई-वडिलांना आपले मूल प्रियच असते. संस्थेचे संस्थापक दिलीप रेडककर यांचा मुलगा मतिमंद आहे. या मुलाचे काय होणार, या विचाराने ते हवालदिल झाले होते. मात्र त्यांनी या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. आपल्यासारख्याच समदु:खी पालकांचा ग्रुप त्यांनी तयार केला आणि मतिमंद मुलांच्या आयुष्यात आशेचे दीप उजळणारी ‘आशादीप’ ही संस्था रत्नागिरीत उभी राहिली.
संस्थेत सर्व सण अगदी गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. मुलांना घरची आठवण येऊ नये किंवा त्यांच्या सेवेत काही कमी पडू नये, यासाठी संस्थेतील कर्मचारी अविरत प्रयत्न करत असतात. सेवाभावी वृत्तीचे हे कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करतात. मुलांना काही तरी काम मिळावे या उद्देशाने संस्थेने स्वयंरोजगार केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे मुले काम करतात आणि त्याचा मोबदला त्यांच्या नावे बँकेत जमा केला जातो. वर्तमानपत्रांपासून पेपर बॅग, कागदी फुले, हिराचे झाडू, पणत्या, उटणे तयार करणे इत्यादी उपक्रम मुलांमार्फत करून घेतले जातात.
संस्था लोकांच्या देणग्यांच्या आधारावरच कार्य करत आहे. त्यामुळे संस्थेला मदतीच्या हातांची गरज आहे. विविध प्रकारच्या मदतीची संस्थेला गरज असून मदत देण्याकरिता संपर्क साधण्याचे आवाहन श्री. रेडकर (84593 48953) यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

