रत्नागिरी : रत्नागिरी आणि कोकणात वंध्यत्वावर काम करणाऱ्या तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरीच्या अध्यक्षा डॉ. तोरल नीलेश शिंदे यांना राज्यस्तरीय वूमन अचीव्हर्स अॅवॉर्ड प्रदान करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्ताने महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स, हर घर रोजगार व टाइम्स ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत प्रथमच कला, क्रीडा, औद्योगिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, राजकीय, सामाजिक या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तीस प्रतिभावंत महिलांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डतर्फे “वूमन अचीव्हर्स अॅवॉर्ड” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात डॉ. शिंदे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अध्यक्ष आदम सय्यद, सेक्रेटरी स्नेहा कुलकर्णी, उपाध्यक्ष सतीश राठोड, कार्याध्यक्ष महेबुब सय्यद उपस्थित होते.
डॉ. तोरल शिंदे यांनी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून रत्नागिरीमध्ये काम करत असताना महिलांमधील वंध्यत्वाच्या समस्येबद्दल त्यांना जाणीव झाली. या विषयावर अधिक अभ्यास करून टेस्ट ट्यूब बेबी ही उपचार पद्धती त्यांनी आत्मसात करून कोकणातील पहिले टेस्ट ट्यूब बेबी सेंटर २०१४ मध्ये रत्नागिरीत सुरू केले. गेल्या नऊ वर्षांत या सेंटरमुळे वंध्यत्वाशी झगडणाऱ्या महिलांना आई होण्याचा मार्ग मिळाला. डॉ. शिंदे यांचे समुपदेशन आणि योग्य उपचार पद्धती यामुळे अनेक दाम्पत्यांना आई-बाबा होण्याचा आनंद त्या देऊ शकल्या. इंडियन मेडिकल असोसिअशनच्या रत्नागिरीच्या अध्यक्षा म्हणून डॉ. तोरल शिंदे यांनी रुग्ण, डॉक्टर यांच्यासह रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका, कर्मचारी यांच्यासाठी विशेष शिबिरांचे, उपक्रमांचे आयोजन केले होते.
त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना वूमन अचीवर्स अॅवॉर्ड” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास दैनिक रत्नागिरी टाइम्स आणि गोवा टाइम्सच्या ऊर्मिलाताई घोसाळकर, कांचन मालगुंडकर, ज्येष्ठ उद्योजक केशवराव इंदुलकर, राहुल पंडित, सतीशराव साळवी, युवा उद्योजक सचिन देसाई उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

