दिलीप रेडकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा २०२२-२३ सालचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन येथील आशादीप मतिमंद मुलांच्या पालक संस्थेचे संस्थापक सचिव दिलीप रेडकर यांचा गौरव करण्यात आला.

मुंबईत नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या भाभा नाट्यगृहात पुरस्काराचे वितरण झाले. रोख १५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

दिव्यांगांची निष्ठेने सेवा करून सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थांचा आणि त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा, कामाला दाद मिळावी, यासाठी शासनाने १९७१-७२ पासून हा पुरस्कार देण्याची योजना सुरू केली आहे.

मतिमंद, गतिमंद मुलांची शेवटपर्यंत काळजी घेणारी व्यक्ती त्यांच्यासोबत असावीच लागते. मुलगी असल्यास ही समस्या तिच्या सुरक्षिततेसाठी अधिकच गंभीर आहे. पालकांच्या पश्चात काय, या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्यांना एकत्र आणून उपाय शोधण्याचे जे प्रयत्न महाराष्ट्रातून सुरू झाले. त्याचे जनक भाल कोरगावकर असून त्यांच्या पुढाकाराने दिलीप रेडकर यांनी रत्नागिरीतील पालकांना एकत्र आणून संघटना स्थापन केली. त्यानंतर महाराष्ट्र व राज्याबाहेरील केरळ ते कोलकाता येथील अनेक पालक संस्थांशी संपर्क साधला. रत्नागिरीत एमआयडीसी भागात संस्थेचे डे केअर सेंटरचे कार्य सुरू झाले. त्यानंतर निवासी स्वयंरोजगार प्रकल्प सुरू झाला. समाजातील दानशूर मंडळी आणि अतिशय निरलसपणे काम करणारे कर्मचारी यांच्या जोरावर संस्थेचे कार्य सुरू आहे.

आशादीप संस्थेत वर्षे ८ ते ५६ या वयोगटातील २५ मुले आहेत. येथे १२ कर्मचारी सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत. समदुःखी पालकांनी संघटनेच्या माध्यमातून एकत्र येऊन उपाय शोधला व तो समाजाच्या मदतीने यशस्वी झाला, याचे आशादीप हे उत्तम उदाहरण आहे. स्वयंरोजगार केंद्रात हिराचे झाडू, कागदी पिशव्या, कलात्मक फुले, आकाशकंदील, पणत्या, राख्या आदी उत्पादन केले जाते. भविष्यात दिव्यांगांना एकत्र घेऊन स्वयंबचत गट स्थापन करण्याचा विचार आहे.

श्री. रेडकर यांना मिळालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने संस्थेलाही बळ मिळाले आहे. संस्थेला मदत करण्याकरिता दिलीप रेडकर यांच्याशी 84593 48953 किंवा 94226 31417 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आशादीप संस्थेविषयी …

रत्नागिरीतील आशादीप संस्था मतिमंद मुलांच्या आयुष्यात आशेचे दीप उजळवण्याचे कार्य करत आहे. मतिमंद मुलांना समाजात योग्य स्थान मिळत नाही. आई-वडील म्हातारे होत जातात. भावंडांना आपापले व्याप असतात. अशा स्थितीत या मुलांचे संगोपन करायचे कोणी, हा प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक आई-वडिलांना आपले मूल प्रियच असते. संस्थेचे संस्थापक दिलीप रेडककर यांचा मुलगा मतिमंद आहे. या मुलाचे काय होणार, या विचाराने ते हवालदिल झाले होते. मात्र त्यांनी या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. आपल्यासारख्याच समदु:खी पालकांचा ग्रुप त्यांनी तयार केला आणि मतिमंद मुलांच्या आयुष्यात आशेचे दीप उजळणारी ‘आशादीप’ ही संस्था रत्नागिरीत उभी राहिली.

संस्थेत सर्व सण अगदी गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. मुलांना घरची आठवण येऊ नये किंवा त्यांच्या सेवेत काही कमी पडू नये, यासाठी संस्थेतील कर्मचारी अविरत प्रयत्न करत असतात. सेवाभावी वृत्तीचे हे कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करतात. मुलांना काही तरी काम मिळावे या उद्देशाने संस्थेने स्वयंरोजगार केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे मुले काम करतात आणि त्याचा मोबदला त्यांच्या नावे बँकेत जमा केला जातो. वर्तमानपत्रांपासून पेपर बॅग, कागदी फुले, हिराचे झाडू, पणत्या, उटणे तयार करणे इत्यादी उपक्रम मुलांमार्फत करून घेतले जातात.

संस्था लोकांच्या देणग्यांच्या आधारावरच कार्य करत आहे. त्यामुळे संस्थेला मदतीच्या हातांची गरज आहे. विविध प्रकारच्या मदतीची संस्थेला गरज असून मदत देण्याकरिता संपर्क साधण्याचे आवाहन श्री. रेडकर (84593 48953, 94226 31417) यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply