वयाच्या ६५ व्या वर्षी विजयालक्ष्मी देवगोजी यांना पीएचडी

लांजा : मराठी साहित्य परिषदेच्या येथील शाखेच्या उपाध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी विजय देवगोजी यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी पीएचडी पदवी संपादन केली आहे.

सौ. देवगोजी यांनी ३२ वर्षे डॉ. पत्की यांच्या दवाखान्यात पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी चालविली. ती बंद करून त्यांनी पीएचडीसाठी अथक परिश्रम करून पावणेतीन वर्षांतच विद्यापीठाला आपला प्रबंध सादर केला. मराठी साहित्यातील वडार समाजजीवनाचे चित्रण या विषयात शोधकार्य पूर्ण केल्याबद्दल राणी चन्नम्मा विद्यापीठाची पीएचडी पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. डॉ. मनीषा नेसकर त्यांच्या मार्गदर्शिका असून या संशोधनासाठी त्यांना डॉ. विनोद गायकवाड, डॉ. चंद्रकांत वाघमारे, डॉ. मैजुद्दीन मुत्तवली, डॉ. संजय कांबळे यांचेही मार्गदर्शन लाभले आहे.

सौ. देवगोजी मूळ बेळगावच्या असून त्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सदस्य आहेत. अजि म्या परदेस पाहिला आणि अशी घडली राजस्विनी अशी त्यांची दोन पुस्तके आतापर्यंत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी ही पदवी प्राप्त केल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे

‘आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे’ या मराठी गीतातील ओळी सार्थ करणाऱ्या सौ. देवगोजी यांनी “मराठी साहित्यातील वडार समाज जीवनाचे चित्रण” या विषयावर आपले संशोधन पूर्ण करून एका वंचित समाजाचा अभ्यास करून आपला प्रबंध राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव विद्यापीठाला सादर केला. नागपूर विद्यापीठ आणि कर्नाटक विद्यापीठ येथील तज्ज्ञांच्या नजरेखालून तावून सुलाखून आल्यानंतर या प्रबंधासाठी राणी चन्नम्मा विद्यापीठाकडून त्यांना पीएचडी ही पदवी प्रदान करण्यात आली.

डॉ. देवगोजी यांच्या मनात ४६ वर्षांपूर्वीच डॉक्टरेट मिळविण्याचे बीज पेरले गेले होते. लौकिक अर्थाचा संसार सांभाळून मुले कर्तबगार होऊन ती आपापल्या व्यवसायात स्थिर झाल्यानंतर ३२ वर्षे चालवलेली लांज्याची पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी बंद करून त्या स्वतःच्या ध्येयाकडे वळल्या. अथक परिश्रम करून केवळ पावणेतीन वर्षांतच त्यांनी विद्यापीठाला आपला प्रबंध सादर केला.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वडार समाजाचे लेखक कैलासवासी रामचंद्र नलावडे हे वडार समाजातील आद्य लेखक समजले जातात. त्यांचे ‘दगडफोड्या’ हे आत्मवृत्त वडार समाजातून लिहिली गेलेली पहिली साहित्यकृती होय. पुढे या लेखकाच्या अनेक साहित्यकृती प्रसिद्धी झाल्या आणि त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील या लेखकाच्या साहित्याचा अभ्यास करण्याकरिता त्यांनी मुलाखतीमध्ये राणी चन्नम्मा विद्यापीठाकडे प्रस्ताव ठेवला, परंतु काही तांत्रिक कारणास्तव त्यांना तो विषय मिळाला नाही. त्याऐवजी “मराठी साहित्यातील वडार समाजजीवनाचे चित्रण” हा विषय मिळाला. केवळ वडार हा एकच शब्द माहिती असलेल्या डॉ. देवगोजी यांनी इंटरनेटवरून शोध घेऊन या समाजातील टी. एस. चव्हाण या लेखकाचा मोबाइल नंबर शोधून काढला. त्यांच्याशी संपर्क केला आणि तेथूनच त्यांनी अवघा वडार समाज समजावून घेतला. त्यासाठी बार्शी, सोलापूर, लातूर, भालकी, उमरगा, पुणे, सातारा, गडहिंग्लज, बेळगाव, रत्नागिरी इत्यादी ठिकाणी भेट दिली. वडार समाजात पूर्णपणे मिसळून या समाजाची सध्या परिस्थिती व साहित्यातील परिस्थिती यांची सांगड घालत आपले संशोधन पूर्ण केले.

वडार समाज हा भटका विमुक्त समाज असल्याने पूर्वी या समाजाला सेटलमेंटमध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या अभ्यासाचा एक भाग म्हणून सोलापूर येथील सेटलमेंटला भेट देऊन पाहणी केली, परंतु आता तेथे सर्वत्र ओसाड प्रदेश असून एक चर्च आणि एक शाळा कशीबशी तग धरून उभी आहे. इंग्रजांनी उभ्या केलेल्या शाळा व दवाखाने भारत सरकारने पुढे चालवल्या असत्या, तर तळागाळातील सर्व समाजाला त्याचा खूपच उपयोग झाला असता, अशी खंत सौ. देवगोजी यांना आहे.

संशोधनादरम्यान सौ. देवगोजी यांनी वडार समाजाची परंपरा, देवदेवता, जन्म, विवाह, मृत्यू, वडारबोली, लोककथा, लोकगीते, वडार समाजातील वीर पुरुष, राजे महाराजे, संत महात्मे, क्रांतिकार्यात राष्ट्रासाठी व समाजासाठी योगदान असलेल्या व्यक्ती, शिल्पीकार इत्यादी गोष्टींचा सखोल अभ्यास केला. वडार संस्कृतीचा सखोल परिचय करून देणारा ५१४ पानांचा आपला प्रबंध त्यांनी पूर्ण केला. इतर मुख्य समाजाचे अनुकरण करून त्याप्रमाणे वाटचाल करणारा सध्याचा वडार समाज मुख्य समाजामध्ये मिसळून जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण वेगळी वडार संस्कृती लोप होण्याची भीती नाकारता येत नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एखाद्या समाजाचा इतिहास त्याला समजावून घेता आला नाही, तर त्या समाजाचा विकास होत नाही. त्यामुळे वडार समाजातील पुढील पिढीला आपल्या वडार संस्कृतीचा इतिहास या प्रबंधातून समजावून घेता येईल. त्यादृष्टीने वडार समाजाविषयीचे एक चांगले दस्तावेजीकरण तयार झाले आहे. त्याचा उपयोग वडार समाजातील व इतरही सर्व स्तरातील लोकांना होईल, अशी खात्री डॉ. देवगोजी यांनी व्यक्त केली आहे.

ज्ञान मिळविण्यासाठी वयाची बंधने आड येत नाही. जिद्द, चिकाटी, सातत्य आणि उत्तम आरोग्य राखल्यास अशक्य असे काहीच नसते, हे सौ. देवगोजी यांच्या उदाहरणावरून समजून येते. या संशोधनकार्यात त्यांच्या कुटुंबीयांनी आणि बेळगाव येथील माहेरच्या सर्व कुटुंबीयांनी त्यांना सर्वतोपरी सहाय्य केले आहे.

यापुढे पोस्ट डॉक्टरेट करण्याची इच्छा असणाऱ्या डॉ. देवगोजी यांना शुभेच्छा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply