Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

यशासाठी सातत्य आणि परिश्रम हवेत – परशुराम गंगावणे

Advertisements

अलोरे (ता. चिपळूण) : जीवनात यश मिळवायचे असेल, तर सातत्य आणि परिश्रम हवेत, असे प्रतिपादन पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी केले.

अलोरे (ता. चिपळूण) येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभाच्या उद्घाटन समारंभात ते आज बोलत होते.

श्री. गंगावणे कुडाळजवळील पिंगुळी गुढीपूर या छोट्याशा गावी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ ’चित्रकथी’ आदिवासी लोककलांचे जतन आणि संवर्धन करणारे ज्येष्ठ कलावंत आहेत. भारत सरकारने २०२१ साली त्यांना ‘पद्मश्री’ने गौरविले आहे. सूत्रसंचालन करताना धीरज वाटेकर यांनी श्री. गंगावणे यांच्या कार्याचा पट उलगडला. त्याला जोड देऊन श्री. गंगावणे म्हणाले, आमच्या आदिवासी ठाकर जमातीने चित्रकथीसारख्या पुरातन कला जपल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात या कलेला राजाश्रय मिळाला होता. पण नंतर तो बंद झाला. त्यामुळे या समाजातील लोकांनी नोकरी करणे पसंत केले. त्यामुळे ही पारंपरिक लोककला लोप पावते की काय, अशी स्थिती निर्माण झाली. अशा वेळी पन्नास वर्षांपूर्वी मी माझ्या वडिलांकडून ही कला शिकून तिचा प्रसार करायचे ठरविले. आता ठाकर समाज कलांगण सुरू केले आहे. तेथे या कलेचे जतन केले आहे. साडेतीनशे वर्षांहून अधिक वर्षे झालेली अनेक कलात्मक चित्रे आणि मोठा ठेवा आम्ही जपून ठेवला आहे. पद्मश्री पुरस्कारामुळे त्याचे सार्थक झाले. हा साऱ्या कोकणवासीयांचा सन्मान आहे, असेही ते म्हणाले.

उद्घाटनप्रसंगी परशुराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, मी दापोली तालुक्यातल्या केळशीसारख्या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतले. ग्रामीण भागातील विद्यार्थी आजही चांगले यश मिळवू शकतात. पण यशाला शॉर्टकट नसतो. तरुणांनी आपल्या कर्तव्याची जाणीव झाली, तर ते स्वतःचा आणि समाजाचाही विकास करतील.

????????????????????????????????????

आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने दोघांनी मनोगत व्यक्त केले. दिव्यांग विद्यार्थी सुरेश शेळके या दहावीतील विद्यार्थ्याने सांगितले की, मी दिव्यांग असूनही या शाळेमुळे इतरांसारखेच शिक्षण मी घेऊ शकलो. याचे श्रेय शाळेला आहे. शाळेतील १९८३ ते १९८८ सालचे विद्यार्थी अभियंता आनंद श्रीधर सावंत म्हणाले, माझ्या जीवनात आणि जडणघडणीत या शाळेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत मी दहावा क्रमांक मिळवू शकलो. स्कॉलरशिपची परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, नाटके, चित्रकला परीक्षा या सर्वांमधून माझे व्यक्तिमत्त्व सर्वांगांनी विकसित झाले. त्रविठ्ठल तो आला आला या नाटकात मी केलेल्या भूमिकेची आठवण आहे, असेही ते म्हणाले. आगवेकर सरांसह आपल्या बहुतेक सर्व शिक्षकांचा नामोल्लेख त्यांनी यावेळी केला.

व्यासपीठावर सीए वसंत लाड (दुबई), माजी शिक्षक-कर्मचारी, शाळेच्या रजिस्टर क्रमांक २ च्या विद्यार्थिनी सौ. राणीदेवी अग्रवाल-गोयल (नवी दिल्ली) इत्यादी माजी विद्यार्थी आणि रवींद्र भुवड, सौ. स्नेहल कापडी, अनंत पंडव, सौ. वैष्णवी सुतार, सौ. रोहिणी आदवडे, सौ. प्रीतम शिंदे हे पालक प्रतिनिधी उपस्थित होते.

अलोऱ्यात अवतरले पंढरपूर

स्वागतयात्रेअंतर्गत शाळेच्या दुपार सत्राच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली ग्रंथदिंडी-वारकरी दिंडी निघाली. ग्रंथदिंडी ही शाळेच्या सध्याच्या इमारतीतून ढोलताशांच्या सवाद्य मिरवणुकीने शासकीय मैदानाकडे रवाना झाली. यावेळी अलोरे येथे जणू काही पंढरपूर अवतरल्याचा भास झाला. दिंडीतील वारकरी विठुनामात तल्लीन झाले होते. जय जय राम कृष्ण हरीचा गजरही होत होता. दिंडी भर दुपारी निघाली, तरी वातावरण अगदी प्रसन्न झाले होते. वाचनाचे महत्त्व सांगण्यासारख्या अनेक घोषवाक्यांचे फलक दिंडीमध्ये दिसत होते. पारंपरिक वेशातील मुले मोठ्या उत्साहाने दिंडीत सहभागी झाले.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी ज्ञानेश्वरीचा ग्रंथ असलेल्या पालखीचे पूजन केले आणि पालखी वाहून दिंडीला प्रारंभ केला. अन्य मान्यवरांनीही काही काळ पालखी वाहून ती विद्यार्थ्यांकडे सुपूर्द केली. ती पुढे शासकीय मैदानावर पोहोचली.

सायंकाळी शिशुविहार आणि पहिली ते चौथीच्या प्राथमिक वर्गाचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम पार पडले.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version