अलोरेत ‘पद्मश्री’ परशुराम गंगावणे यांच्या हस्ते आगवेकर विद्यालय सुवर्ण महोत्सवाचे मंगळवारी उद्घाटन

अलोरे (ता. चिपळूण) : येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या २६ ते ३० डिसेंबर २०२२ दरम्यान शाळेच्या संकुलात सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ होत आहे. महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी (दि. २७ डिसेंबर) सकाळी १० वाजता ‘पद्मश्री’ परशुराम गंगावणे यांच्या हस्ते होणार आहे.

श्री. गंगावणे कुडाळजवळील पिंगुळी गुढीपूर या छोट्याशा गावी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ ’चित्रकथी’ आदिवासी लोककलांचे जतन आणि संवर्धन करणारे ज्येष्ठ कलावंत आहेत. भारत सरकारने २०२१ साली त्यांना ‘पद्मश्री’ने गौरविले आहे.

उद्घाटन प्रसंगी परशुराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत, सीए. वसंत लाड (दुबई), कोयना जलविद्युत प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नितेश पोतदार, माजी शिक्षक-कर्मचारी प्रमोद घोडके, शंकर देवजी गायकवाड, रामचंद्र सोनू शिर्के, म. तु. वाटेकर तसेच शाळेच्या रजिस्टर क्रमांक १च्या विद्यार्थिनी सौ. प्रभावती कोनसिरसगी-बन्नी, सौ. राणीदेवी अग्रवाल-गोयल (नवी दिल्ली), गुरूदत्त साळोखे, मिलिंद गडकरी (कोल्हापूर), डॉ. बसवराज कोरे (सातारा), लक्ष्मण जाधव, सतीश कुलकर्णी, अनंत दाजी राणे, दत्ताराम रांगवकर (मुंबई), आनंद श्रीधर सावंत (बेंगलोर), अमित मोरेश्वर आगवेकर, डॉ. शिल्पा कुलकर्णी (पुणे), प्रवीण आडविलकर (पठाणकोट), डॉ. निलेश बाकले (कराड), डॉ. योगिता नालंग-पाटील (जळगाव), गिरीश प्रकाश शिंदे हे माजी विद्यार्थी आणि रवींद्र भुवड, सौ. स्नेहल कापडी, अनंत पंडव, सौ. वैष्णवी सुतार, सौ. रोहिणी आदवडे, सौ. प्रीतम शिंदे हे पालक प्रतिनिधी उपस्थित राहाणार आहेत.

उद्घाटनानंतर शाळा संकुलात एन. एच. देशपांडे स्मृतीविचार मंचावर श्रेणीयुक्त कार्यक्रम / चर्चागट अंतर्गत ११ व १२वी कला विद्यार्थ्यांशी ‘पद्मश्री’ परशुराम गंगावणे संवाद साधतील.

स्वागतयात्राअंतर्गत शाळेच्या दुपार सत्राच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली ग्रंथदिंडी-वारकरी दिंडी निघणार आहे. ग्रंथदिंडी ही शाळेच्या सध्याच्या इमारतीतून सवाद्य मिरवणुकीने शासकीय मैदानाकडे रवाना होईल. मैदानावर उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत ५० घंटा टोल वाजवून ‘बालगोकुलम’चा प्रारंभ होईल. बालगोकुलम अंतर्गत लगोरी, पाच खड्यांचे खेळ, हुतूतू, काचकवड्या, आबाधुबी, गोट्या, लंगडी, सोनसाखळी, विटी-दांडू आदी पारंपरिक मातीतील खेळ खेळले जातील. यानंतर तेथे कृष्ण, सुदामा आणि त्यांचे सवंगडी पोषाखात पोह्यांचा प्रसाद वाटप करतील. याचवेळी शाळेचे ५वी ते ७वी आणि ११/१२वी वाणिज्य गटातील काही विद्यार्थी शाळेच्या स्मृतीस्थळाजवळ (जुने गुरुदक्षिणा सभागृह) वृक्षारोपण करून ‘बालगोकुलम’साठी शासकीय मैदानावर पोहोचतील. योगेश श्रीराम शिंदे ( कोळकेवाडी) हे मल्लखांब प्रात्यक्षिक सादरीकरण करतील. यावेळी अलोरे ग्रामपंचायत सरपंच प्रमोद महाजन आणि पदाधिकारी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित असतील.

प्रभावती कोनसिरसगी-बन्नी

सुवर्ण महोत्सवांतर्गत १९७२ ते ९२ या कालावधीत शाळा ज्या विविध इमारतींमध्ये भरत होती त्याठिकाणी वृक्षारोपण आणि वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला जाणार आहे.

शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी १९७२ साली शाळेत प्रवेश घेतलेल्या आणि शाळेच्या जनरल रजिस्टरवरील क्रमांक १च्या विद्यार्थिनी प्रभावती कोनसिरसगी-बन्नी (बेळगाव) यांची उपस्थिती हा शाळेच्या दृष्टीने सुवर्णयोग आहे. कोयना प्रकल्पात त्यांचे वडील डेप्युटी इंजिनिअर होते. प्रभावती या वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत.

पहिल्या दिवशी सायंकाळी सायं. ४ ते ७ वाजता करमणूक कार्यक्रमांतर्गत शाळेतील शिशुविहार व १ ते ४ प्राथमिक वर्गाचे विविध गुणदर्शन असेल. आनंद सावंत शाळेच्या सर्व कर्मचारी वृंदांशी ‘योगासन व आरोग्य’ या विषयावर संवाद साधतील. या कार्यक्रमास उपस्थित राहावे आणि सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभाचा हा ‘आनंदोत्सव’ यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्रयत्नांना सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध आणि शाळा समिती चेअरमन विठ्ठल चितळे यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply