रत्नागिरी : सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांकरिता एसीच्या रत्नागिरी आगारातर्फे खास रत्नागिरी दर्शन एसटी फेरी सोडण्यात येणार आहे. येत्या २८ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात ही फेरी दररोज धावणार आहे.
दररोज सकाळी ८ वाजता रत्नागिरी एसटी बसस्थानकातून सुटणाऱ्या या बसमधून आडिवरे, कशेळीचे कनकादित्य मंदिर, कशेळीतील देवघळी, गणेशगुळे, पावस, थिबा राजवाडा, भगवती किल्ला, टिळक जन्मस्थान, आरे-वारे समुद्रकिनारा, गणपतीपुळे येथील सफर घडविली जाईल. ही बस सायंकाळी ७ वाजता रत्नागिरीत परत येईल.
या बसकरिता प्रौढाला प्रत्येकी ३००, तर लहान मुलाला प्रत्येकी १५० रुपये भाडे आकारले जाईल. अधिक माहितीसाठी आगार व्यवस्थापक (७५८८१९३७७४) किंवा स्थानकप्रमुख (९८५०८९८३२७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

