अलोरे (ता. चिपळूण) : आपल्या रौप्यमहोत्सवी कारकिर्दीत राज्यातील एकोणिसावी आदर्श शाळा असा नावलौकिक संपादन केलेली अलोरे (ता. चिपळूण) येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा २६ ते ३० डिसेंबर २०२२ दरम्यान सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ होत आहे. महोत्सवाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि. २६) सायंकाळी ६ वाजता शाळेच्या माजी विद्यार्थिनी पुण्यातील दीपाली इनामदार-देशपांडे (संगीत अलंकार) यांची शास्त्रीय गायन ‘संध्या’ रंगणार आहे.

यानिमित्ताने अलोरे शाळेच्या संकुलात ‘स्वर कृतज्ञतेचा’ घुमणार आहे. दीपाली यांचे माध्यमिक शिक्षण अलोरे शाळेत झाले आहे. त्यांचे वडील कोयना जलविद्युत प्रकल्पात अभियंता होते. त्यांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स’ विषयात पदवी संपादन केली आहे. उच्चशिक्षण घेत असताना त्यांनी शालेय वयात गाण्याचा छंद जिद्दीने जोपासला. पुण्यातील प्रसिद्ध ‘गानसभा’ समूहात तसेच जगभरातील संगीत साधकांना ऑनलाइन पद्धतीने त्या गायनाचे मार्गदर्शन करीत असतात. ‘स्वरांच्या साधनेत विश्वशांतीचा मंत्र आहे’, अशी त्यांची श्रद्धा आहे.
यावेळी परशुराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत, सीए. वसंत लाड (दुबई), प्रकल्पातील निवृत्त अभियंता इनामदार, डॉ. उषाताई लिमये, चिपळूणमधील ओंकार संगीत साधनेचे सौ. व श्री. सतीश कुंटे, सौ. अमृता आठवले-आगवेकर, अलोरे शाळेचे माजी शिक्षक – कर्मचारी अरुण माने (शाळा-संस्था समन्वयक), अनिल गणपत्ये, रामचंद्र खोत, मोहन लवंडे, कमलाकर शेलार, संजय भागवत (सातारा), सविता काळे-केसकर (दुबई) हे माजी विद्यार्थी आणि स्वप्नील चांदिवडे, नितेश चव्हाण, अश्विनी खेडेकर, गणेश कदम, रंजना झोरे, ज्योती शिंदे हे पालक प्रतिनिधी उपस्थित असतील.
संगीत संध्येसाठी ॲड. शशिकांत पिरदनकर, ओंकार शिर्के, पवन मोहिते, संदीप पवार, प्रदीप चव्हाण आदी कला क्षेत्रातील स्थानिक माजी विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. यानिमित्ताने दीपाली यांच्या बॅचच्या स्थानिक माजी विद्यार्थ्यांचे शाळेत एकत्रीकरण होणार आहे. या स्वरसंध्येचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित राहावे आणि सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभाचा हा ‘आनंदोत्सव’ यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्रयत्नांना सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध आणि शाळा समिती चेअरमन विठ्ठल चितळे यांनी केले आहे.


