महाराष्ट्रातील पहिला फुलराणी कक्ष पावस येथे सुरू


रत्नागिरी : शालेय विद्यार्थिनींचे आरोग्य आणि स्वच्छतेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यालयात महाराष्ट्रातील पहिल्या फुलराणी कक्षाचे उद्घाटन रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

मासिक पाळीच्या काळात विद्यार्थिनींना अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानांचा सामना करावा लागतो. या संवेदनाशील काळात त्यांना हक्काची जागा आणि सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.​या कक्षात विश्रांतीसाठी स्वतंत्र जागा असेल. शाळेच्या वेळेत त्रास जाणवल्यास विद्यार्थिनींना येथे आराम करता येईल. सॅनिटरी नॅपकिन्स आणि इतर आवश्यक स्वच्छता साहित्य उपलब्ध असेल. तज्ज्ञांकडून आरोग्याबाबत योग्य माहिती आणि सल्ला दिला जाईल. मासिक पाळीशी संबंधित भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी समुपदेशन करून मानसिक आधार दिला जाईल. वाढत्या वयातील मुलींमध्ये आढळणाऱ्या PCOD (Polycystic Ovarian Disease) या समस्येवर जनजागृती आणि उपचारांवर भर दिला जाईल.

हा स्तुत्य उपक्रम अनुसया महिला स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये असे कक्ष उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुलींमध्ये आरोग्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होणार आहे.

हा महाराष्ट्रातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. मासिक पाळीच्या स्वच्छतेबाबत गांभीर्याने विचार करणारी ही यंत्रणा आहे. योग्य सुविधांमुळे मुलींच्या शाळागळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

“फुलराणी कक्ष हा केवळ एक उपक्रम नसून, विद्यार्थिनींच्या सन्मानपूर्ण आणि सशक्त भविष्यासाठी उचललेले एक संवेदनशील पाऊल आहे. यामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढण्यास नक्कीच मदत होईल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply