अलोरे (ता. चिपळूण) : येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव येत्या २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत होत असून महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. २८ डिसेंबर) सकाळी १० ते १ या वेळेत मरिनर दिलीप भाटकर उपस्थित राहणार आहेत.

दिलीप भाटकर हे स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिल्या सुक्या गोदीचे यशस्वी जलावतरण करणारे आणि पश्चिम भारतातील दुसरा शिप ब्रेकिंग प्रकल्प उभारणारे मरिनर आहेत. नौकानयन क्षेत्रात जागतिक पातळीवर वावर असणारे भाटकर मरीन सिंडिकेट प्रा. लि. रत्नागिरीचे संचालक आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना संस्थेचे पदाधिकारी तसेच पालक प्रतिनिधीही उपस्थित राहाणार आहेत.
उद्घाटनानंतर शाळा संकुलात चारुशीला मुकुंद जोशी स्मृतीविचार मंचावर श्रेणीयुक्त कार्यक्रम / चर्चागट अंतर्गत ११/१२वी वाणिज्य विद्यार्थ्यांशी मरीनर’ दिलीप भाटकर संवाद साधतील. पाचवीतील विद्यार्थ्यांशी प्रज्ञा नरवणकर, सातवी सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांशी आनंद सावंत (विषय : निसर्ग छायाचित्रण) आणि डॉ. शिल्पा कुलकर्णी संवाद साधतील. स्वागतयात्रा अंतर्गत शाळेच्या शिशुविहार व प्राथमिक विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली वृक्षदिंडी (शेतकरी) निघणार आहे. वृक्षदिंडी शाळेच्या सध्याच्या इमारतीतून सवाद्य मिरवणुकीने शासकीय मैदानाकडे रवाना होईल. मैदानावर उपस्थित मान्यवरांच्या उपस्थित ५० घंटा टोल वाजवून ‘बालगोकुलम’चा प्रारंभ होईल. बालगोकुलम अंतर्गत लगोरी, पाच खड्यांचे खेळ, हुतूतू, काचकवड्या, आबाधुबी, गोट्या, लंगडी, सोनसाखळी, विटी-दांडू आदी पारंपरिक मातीतील खेळ खेळले जातील. वैभव देवरूखकर हे शरीरसौष्ठव प्रात्यक्षिक सादर करतील. यानंतर तेथे कृष्ण, सुदामा आणि त्यांचे सवंगडी पोषाखात पोह्यांचा प्रसाद वाटप करतील. याचवेळी शाळेचे आठवी ते बारावीचे काही विद्यार्थी स्मृतिस्थळाजवळ वृक्षारोपण करून बालगोकुलमसाठी शासकीय मैदानावर येतील. यावेळी कोळकेवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ. सुरेखा बोलाडे, उपसरपंच श्रीकांत निगडे व कुंभार्ली सरपंच रवींद्र सकपाळ, उपसरपंच संदीप कोलगे, पदाधिकारी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित असतील.
सुवर्ण महोत्सवांतर्गत १९७२ ते ९२ या कालावधीत शाळा ज्या विविध इमारतींमध्ये भरत होती त्याठिकाणी वृक्षारोपण आणि वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला जाणार आहे. या दुसऱ्या दिवशी सायंकाळी सायं. ४ ते ७ वाजता करमणूक कार्यक्रमांतर्गत शाळेतील पाचवी ते सातवी आणि अकरावी-बारावी कला-वाणिज्य वर्गाचे विविध गुणदर्शन असेल.
या कार्यक्रमास उपस्थित राहावे आणि सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभाचा हा ‘आनंदोत्सव’ यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्रयत्नांना सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध आणि शाळा समिती चेअरमन विठ्ठल चितळे यांनी केले आहे.


