अलोरे (ता. चिपळूण) : येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा २६ ते ३० डिसेंबरदरम्यान सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ होत आहे. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. २९ डिसेंबर) सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ग्रामीण उद्योजक राजन दळी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

दळी कृपा हेअर टॉनिकच्या माध्यमातून, उद्योग आणि उद्योजक फक्त शहरातच बहरतात, या समजुतीला छेद देणारे व किराणा मालाच्या दुकानापासून ते लोकप्रिय आयुर्वेदिक औषधी तेल निर्मितीचा प्रवास करणारे धोपावे (गुहागर) येथील उद्योजक आहेत.
या समारंभाला सीए वसंत लाड (दुबई), जलसंपदा विभाग साताराचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, संस्था उपाध्यक्ष सुधीर तलाठी, धरणीधर महादेव आगवेकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. माजी शिक्षक-कर्मचारी सुभानु गणेश पोंक्षे (दापोली), वसंत केरूरे (शिरगाव), सौ. वैशाली केतकर, मनोहर शितप, रत्नाकर जंगम (चिपळूण) तसेच सौ. मंजुषा देशपांडे-कुलकर्णी (पुणे), डॉ. हेमराज चिटणीस (मुंबई), डॉ. उदय फडतरे (सातारा), प्रसाद कारखानीस (मुंबई) हे माजी विद्यार्थी आणि शशिकांत बारसकर, सौ. गौरी शिंदे, संदेश मोहिते, सौ. शर्मिला चव्हाण, दीपक मोहिते, नारायण पानगले, संतोष कदम, सौ. रेश्मा शिगवण, सौ. विद्या सावरटकर हे पालक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनानंतर शाळा संकुलात अनंत लक्ष्मण आग्रे स्मृतीविचार मंचावर श्रेणीयुक्त कार्यक्रम, चर्चा गटांतर्गत अकरावी-बारावी विज्ञान विद्यार्थ्यांशी राजन दळी संवाद साधतील. तर नववी, दहावीच्या विज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यांशी मंजुषा देशपांडे-कुलकर्णी आणि प्रसाद कारखानीस संवाद साधतील.
स्वागतयात्रेअंतर्गत शाळेच्या सकाळ सत्राच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली जलदिंडी (श्रावणबाळ) निघणार आहे. जलदिंडी शाळेच्या सद्याच्या इमारतीतून सवाद्य मिरवणुकीने शासकीय मैदानाकडे रवाना होईल. मैदानावर उपस्थित मान्यवरांच्या उपस्थित ५० घंटा टोल वाजवून ‘बालगोकुलम्’चा प्रारंभ होईल. बालगोकुलम्अंतर्गत लगोरी, पाच खड्यांचे खेळ, हुतूतू, काचकवड्या, आबाधुबी, गोट्या, लंगडी, सोनसाखळी, विटी-दांडू आदी पारंपरिक मातीतील खेळ खेळले जातील. ‘फिटनेस ट्रेनर’ तुषार रमेश पवार (माणगाव) विशेष मार्गदर्शन करतील. यानंतर तेथे कृष्ण, सुदामा आणि त्यांचे सवंगडी पोषाखात पोह्यांचा प्रसाद वाटप करतील. यावेळी शिशुविहार व प्राथमिक आणि अकरावी-बारावी कला या गटातील काही विद्यार्थी स्मृतिस्थळाजवळ वृक्षारोपण करून ‘बालगोकुलम्’साठी शासकीय मैदानावर येतील. ग्रामपंचायत नागावे सरपंच प्रकाश चिपळूणकर, उपसरपंच सुरेश साळवी व कोंडफणसवणे सरपंच वैशाली जिनगरे, उपसरपंच सुरेश शिगवण पदाधिकारी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित असतील.
तिसऱ्या दिवशी सायंकाळी सायंकाळी ४ ते ७ वाजता शाळेतील ८ वी ते १० वी, ११ वी १२ वी विज्ञान वर्गाचे विविध गुणदर्शन असेल. सायं. ६ वा. ‘शिवचरित्र’ या विषयावर विनय लाड (कोलाड) यांचे व्याख्यान होईल.
कार्यक्रमास उपस्थित राहावे आणि सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभाचा हा ‘आनंदोत्सव’ यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्रयत्नांना सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध आणि शाळा समिती चेअरमन विठ्ठल चितळे यांनी केले आहे.


