Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

कोणताही उद्योग जिद्दीने करणे आवश्यक : डॉ. श्रीधर ठाकूर

Advertisements

रत्नागिरी : उद्योगिनी फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली विविध उद्योग करणाऱ्या महिला एकत्र आल्या आहेत. कोणताही उद्योग जिद्दीने करणे आवश्यक आहे, असे मत इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी येथे व्यक्त केले.

उद्योगिनी फाउंडेशनने येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात दीपोत्सव प्रदर्शन आयोजित केले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, मन, बुद्धी, प्रयत्न आणि तत्त्व या चार गोष्टी असल्यास कोणताही उद्योग यशस्वी होतो. अर्थातच त्यात अडचणी येतात. पण मन, बुद्धी, प्रयत्न आणि तत्त्व एकत्र केल्यास मार्ग निघतो. यश मिळते. प्रत्येक उद्योजक महिलेने आपल्याकडे वेगळे काय आहे, लोकांपर्यंत मार्केटिंग कसे करावे, लोकांना रुचेल आणि भावेल अशा पद्धतीने वेगळेपणाने कसे लोकांपर्यंत जाता येईल, याचा विचार करावा. कारण स्पर्धा हा जीवघेणा भाग आहे.

उद्घाटन समारंभात कायदा सल्लागार ॲड. प्रिया लोवलेकर, सामाजिक कार्यकर्त्या आणि माजी शिक्षिका सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनीही शुभेच्छा दिल्या.

यावेळी फाउंडेशनच्या झोनल हेड संगीता जोशी, पीआरओ स्नेहा जोशी, रत्नागिरी चॅप्टर हेड रश्मी प्रभुदेसाई, सचिव पल्लवी मेहेंदळे, सहसचिव विश्वनाथ केळकर आदी उपस्थित होते.

प्रदर्शनात वेगवेगळ्या वस्तूंचे ३४ स्टॉल्स उभारण्यात आले असून हे प्रदर्शन रविवार, २९ ऑक्टोबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version