स्थानिकांना रोजगार देणारा पर्यटन विकास आवश्यक – उदय सामंत

रत्नागिरी : कोकण हा पर्यटनाचा गाभा आहे. पर्यटक कोकणाकडे आकर्षित झाले पाहिजेत आणि पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, या भूमिकेतून एकत्रितपणे सर्वांनी कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज येथील अल्पबचत सभागृहात जिल्हा उद्योग केंद्र आणि रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था तसेच कोकण पर्यटन उद्योग संघ यांनी एकत्रितरीत्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे सामंत बोलत होते. ते म्हणाले की, कोकणातील आंबा, काजू, फणस, मांसाहारी जेवण, कोकणाची खाद्यसंस्कृती सातासमुद्रापार गेली पाहिजे. पर्यटक आपल्याकडे आले पाहिजेत. यासाठी सर्वांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे. पर्यटन विकासातून रोजगारनिर्मिती व्हायला हवी, याकरिता पालकमंत्री म्हणून आवश्यक सर्व प्रयत्न मी करेन.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील म्हणाले की, निसर्ग संरक्षण करतानाच सोयीसुविधा दिल्या, तर पर्यटनाचा आनंद द्विगुणित होईल आणि हे शाश्वत पर्यटन होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. जिल्ह्यात कृषी पर्यटन, साहसी खेळ, खाडी पर्यटन, सह्याद्री, कातळशिल्प आणि समुद्रकिनारे या सर्वच ठिकाणी पर्यटनाला मोठा वाव आहे. तो वाढविण्यासाठी स्थानिकांनी अधिक पुढाकार घेतला पाहिजे. हॉटेल असोसिएशन, पर्यटनविषयक संस्था या सर्वांनी एकत्र येऊन सांघिक प्रयत्न करण्याची गरज आहे. झिपलाइन, फेरीबोट पर्यटन यासह विविध प्रकारचे पर्यटनाचे चारशे प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी विविध जिल्ह्यांतील पर्यटनाबाबत माहिती दिली. प्री वेडिंग फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी यासह नवनवे उद्योगांकरिता शासनाचा उद्योग विभाग विविध योजना राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.

हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर म्हणाले की, पर्यटनाच्या विकासासाठी आपण काय करू शकतो, याविषयीची जनजागृती तर आवश्यक आहे. त्यासाठी तालुका पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत. पर्यटन म्हणजे पक्षविरहित चळवळ असली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर म्हणाले की, पर्यटनाकरिता विविध सोयीसुविधा निर्माण करण्याकरिता सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही. स्थानिक परिस्थिती पाहून आपणच एकत्रितरीत्या किंवा स्वतंत्रपणे पर्याय शोधले पाहिजेत. अडचणींमधून मार्ग काढला पाहिजे. नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये म्हणाले की, पर्यटनासाठी रस्त्यासारख्या पायाभूत सुविधा आवश्यक असून त्यासाठी पर्यटन व्यावसायिकांचा दबाव गट तयार केला पाहिजे. अनेक योजनांसाठी सरकारकडून भरपूर निधी जाहीर केला जातो. तो जातो कोठे, याचाही जाब विचारला गेला पाहिजे. दबाव गट तयार झाला, तर ते शक्य होईल. पायाभूत सुविधा सरकारकडूनच मिळविल्या पाहिजेत. बँक ऑफ इंडियाचे अधिकारी प्रदीप सिंग यांनी पर्यटनाकरिता मुद्रा योजनेसह विविध योजनांमधून पतपुरवठा करणे शक्य असल्याचे सांगितले. त्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावर्षीच्या एप्रिलपासून पर्यटनाच्या क्षेत्रातील सुमारे ३०० जणांना कर्ज उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी नमूद केले.

दिवसभर चाललेल्या या महोत्सवामध्ये पर्यटनविषयक माहितीसत्र, चर्चासत्र, परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर कोकणभूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, महेश सानप, वीरेंद्र सावंत, सॅमसन डिसिल्वा, मंगेश कोयंडे, पर्यटन विभागाचे श्री. माळी, युयुत्सु आर्ते आणि पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर आदी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply