नागपूर-मडगाव एक्स्प्रेसचा संगमेश्वर थांबा बंद केल्याने संताप

रत्नागिरी : नागपूर-मडगाव साप्ताहिक एक्स्प्रेसचा संगमेश्वर थांबा बंद केल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. आता ते आंदोलनाच्या तयारीत आहेत.

सणासुदीच्या दिवसांत नागपूर-मडगाव-नागपूर साप्ताहिक एक्स्प्रेस गाडी सुरू होती. त्याप्रमाणे या गणपती महोत्सवाच्या काळातसुद्धा ही गाडी सुरू केली गेली. त्यावेळी संगमेश्वर रोड स्थानकामध्ये या गाडीला थांबा होता. ही गाडी गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. आता त्या गाडीला येत्या ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी कायमस्वरूपी सुरू राहणार अशी बातमी पुढे आली आणि या गाडीचा संगमेश्वर रोड थांबा काढण्यात आला.

याबाबत संताप व्यक्त करताना निसर्गरम्य चिपळूण निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपचे प्रमुख आणि पत्रकार संदेश जिमन म्हणाले की, नेत्रावती, मत्स्यगंधा या एक्स्प्रेस गाड्यांसाठी सुरू असलेले आंदोलन संपूर्ण संगमेश्वर तालुक्याला माहीत आहे. एकदा आम्ही उपोषणही केले. यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आंदोलन नको, अशी मान्यवर मंडळींनी विनंती केली म्हणून आम्ही आंदोलन मागे घेतले.

असे असले तरी कोकण रेल्वेचा कोकणाबद्दल दुजाभाव चालू आहेच. नागपूर-मडगाव एक्स्प्रेसचा थांबा बंद केल्याने ते सिद्ध झाले आहे. संगमेश्वर रोड थांबा बंद करण्याचे कारण समजू शकले नाही. त्यामुळे संपूर्ण संगमेश्वर तालुका या बातमीने पेटून उठला आहे. आता आंदोलनासाठी जनमताचा रेटा वाढू लागला आहे. कोकण रेल्वेसोबत पत्रव्यवहार झाला आहे. आता आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तसेच मागणी मान्य झाली नाही, तर परत एकदा उपोषणासारखे आंदोलन करावे लागेल व होणार्या परिणामाला कोकण रेल्वेच जबाबदार असेल, असेही श्री. जिमन यांनी कळविले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply