देवरूख : येथील देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज अग्नीवीर प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला.

सर्वप्रथम महाराष्ट्राचे भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत व माजी सैनिक अमर चाळके यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज व भारतमातेच्या प्रेरणादायी घोषणांनी उपस्थितांनी परिसर दणाणून सोडला.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या कै. द. ज. कुलकर्णी सेमिनार हॉलमध्ये झाली. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, माजी सैनिक पुंडलिक पवार, सूर्यकांत पवार आणि अमर चाळके यांच्यासह देवरूखचे उपनगराध्यक्ष वैभव कदम, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, क्रीडा शिक्षक तानाजी कदम यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात प्रा. स्नेहलता पुजारी यांनी प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेचा उद्देश व आयोजित केले जाणारे उपक्रम यासंबंधीचा आढावा घेतला.
निवृत्त मरीन इंजिनियर अमर चाळके यांनी मार्गदर्शन करताना, अग्निपथ योजनेची प्रवेश प्रक्रिया, या योजनेमुळे होणारे विविध फायदे, उमेदवारांकडून होणारी देशसेवा आणि त्यांच्या भविष्याला मिळणार आकार, अग्नीवीरांना चार वर्षांचा सेवाकाल संपल्यानंतर मिळणारे विविध फायदे व मानसन्मान याबाबतचा सविस्तर आढावा घेतला. सदानंद भागवत यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना अग्निवीर योजनेमुळे विद्यार्थिदशेत युवकांना मिळणार्या विविध लाभांविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्याही याप्रसंगी विशद केल्या. देवरूख व परिसरातील माजी सैनिकांचा विविध कार्यात नियमितपणे मिळणाऱ्या पाठिंब्याबाबत ऋण व्यक्त केले. संस्थेकडून दिले जाणारे मैदानी प्रशिक्षण, लेखी परीक्षेबाबतचे मार्गदर्शन व पुरविला जाणारा पौष्टिक आहार याबाबतचे विवेचन केले.उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी आपल्या मनोगतात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होऊन देशप्रेमाचे व्रत स्वीकारावे, असे आवाहन केले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

